‘सक्षम ऑटो स्प्रे पेंटर घडविताना – विश्वासू कामगाराचा कौशल्यग्रंथ’


दैनिक स्थैर्य । दि. ११ जानेवारी २०२३ । सातारा । आजपर्यंत आपण कथा,कादंबरी ,कविता इत्यादी साहित्याची पुस्तके आणि त्यावरील समीक्षा मोठ्या प्रमाणात वाचल्या आहेत.पण माहुली [जिल्हा -सांगली] सारख्या ग्रामीण भागातील सचिन अवघडे यांनी २५ वर्षाचा कामाचा दीर्घ अनुभव घेऊन एक हटके पुस्तक लिहिलेले आहे.ते पुस्तक म्हणजे म्हणजे एक अनुभवामृत आहे ‘वाटचाल सक्षम ऑटो स्प्रे पेंटर घडविण्याची’ या पुस्तकाच्या नावातूनच उद्देश स्पष्ट झालेला आहे. साहित्य लिहिण्याची उर्मी जशी असावी तसेच आपण घेतलेला कामाचा अनुभव अतिशय तरलपणे सोप्या भाषेत प्रकट करण्याची किमया या ग्रंथाचे लेखक सचिन अवघडे यांनी साधलेली
आहे . लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे त्यांच्या या लेखनाची प्रेरणा आहेत. दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ जर ३०-४०
कादंबऱ्या,लोकनाट्य,कथा,चित्रपट कथा लिहित असतील तर आपण का नाही ? हे सारे या पुस्तकाच्या मुळाशी आहे.तळागाळातील लोकांना हिम्मत देणारे साहित्य अण्णाभाऊ यांनी लिहिले आहे खेड्यातील मागासवर्गीय लोकांचे जीवन म्हणजे एक शोषणचक्र आहे. खेड्यात गरिबी ही पाचवीलाच पुजलेली. ज्याच्याकडे शेती नाही,भांडवल नाही, माणसाला स्वातंत्र्य, मानसन्मान आणि स्थायी रोजगार मिळेल याची शाश्वती नसल्याने लोक शहराच्या वाटा पकडतात.त्यातूनच स्वातंत्र्याची आणि आकांक्षेची नवी वाट दिसायला लागते. गरिबीत पालन पोषण करणाऱ्या आपल्या आई वडिलाना अनेक मुले लहानपणापासून मजुरीला सोबत जाऊन साथ देत असतात. घराला
आधार देत असतात. खेड्यातील मागास वर्गीयातील निम्म्याहून जास्त मुले ही शाळा सोडत असतात. सरकारी आकडे काहीही असो , पहिली ते १० वीचे दरम्यान मोठी गळती आहे .पोटासाठी अनेक कुटुंबे स्थलांतर करीत आहेत, अशा वेगवेगळ्या अडचणीमुळे या मुलांच्या मनात फार मोठे होण्याच्या मह्त्वाकांक्षा जन्म घेत नाही. भोवतालचे सांस्कृतिक पर्यावरण पोटार्थी असते. त्यामुळे भाकरीचा चंद्र शोधण्यात अर्धे आयुष्य जाते, मुलांची अपेक्षित इच्छा पूर्ण होतील याची शाश्वती त्या काळी नसे.सचिन अवघडे यांचे असेच झाले. गावाकडे कसेबसे जगत असताना लहानपणी शाळा देखील नीट करता आली नाही. रोजगारासाठी आई, वडील इतरांच्या सोबत काम करताना शाळेत गैरहजेरी वाढत गेली ..५ वी पासून ७ वी पर्यंत शिक्षण कसेतरी झाले याचेच सचिनला आश्चर्य वाटते. जीवन व्यवहार सांभाळताना शाळेचे महत्व गरीब मुलांच्याकडून कसे कमी होते याची मुळे मला या पुस्तकात सापडतात. पुढे बरीच वर्षे अनुभवाच्या विद्यापीठात माणसांचा संपर्क आल्यावर मनात आपले अनुभव कथन करण्याची भावना झाली. त्यातूनच या पुस्तकाचा जन्म झाला. साहित्य लेखन करणाऱ्यामध्ये मध्यम वर्गीय व श्रीमंत लोक यांचे प्रमाण अधिक आहे. पण कामगार असलेल्या माणसात देखील प्रतिभा असते ती अभिव्यक्त व्हायचा प्रयत्न करते हे अनेकदा सिद्ध झाले आहे .नारायण सुर्वे यांनी शोषितांचे जग ,कामगारांचे जग मोठे असल्याचे सांगितले आहे .कामगार हाच ब्रह्म आहे. तो अनेक नवनवीन तंत्रे तयार करीत असतो,आणि हे जग सुखी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. ऐका घामाची कहाणी फिरवी कळ ब्रह्म्यावानी’ हे खरेच आहे. आपल्या चुलतभावाने कराडला पत्राने बोलवले त्या नंतर तो कराडला गेला
आणि तिथे २५ वर्षे ऑटो स्प्रे पेंटीगचे काम केले …ते अनुभव संचित घेऊन हे ज्ञान देणारे हे पुस्तक निर्माण झाले. आपल्या जन्मदात्या आई वडिलाना हे पुस्तक अर्पण केले आहे. ऑटो पेंटिंग विषयातले ज्ञान इतरांना मिळावे ही प्रेरणा तीव्र असली तरी या निमित्ताने आत्माविष्कार करायला मिळतो हा आनंद सचिनला मोठा आहे .कल्पनेच्या भराऱ्या न मारता आपल्या अनुभवातून लाभलेले ज्ञान सांगावे, त्यातले धोके सांगावे, कामाची पद्धती सांगावी या उद्देशाने या पुस्तकाचे २० भाग केलेले असून शेवटी व्यवसायातील पारिभाषिक शब्द आणि त्यांचे अर्थ
सांगायचा प्रयत्न देखील या पुस्तकात केलेला आहे. अनुभवातून मिळविलेले ज्ञान वाटण्यासाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे.

मनोगतात १९९७ ते २०२२ या काळात आपण पेंटीग व्यवसायात कसे वळलो, आपले शिक्षण ,कराडच्या चुलत भावाने पत्र पाठवून या कामासाठी बोलवून घेणे, पूर्वीचे दिवस,सुरुवातीला या क्षेत्राची माहिती घेताना झालेल्या गंमती देखील प्रांजळपणे सचिन यांनी कथन केल्या आहेत. पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे सजग व्यक्तिमत्व तानाजी चव्हाण आणि ‘भिनवाडा’ ही कादंबरी ज्यांनी लिहिली ते करुणाशील व्यक्तिमत्व बाळासाहेब कांबळे [गुरुजी ]यांच्या मार्गदर्शनाने हे पुस्तक तयार केल्याची कृतज्ञता त्यांनी मनापासून व्यक्त केली आहे. ‘पूर्वीचे पेंटिंग’ या पहिल्या प्रकरणात सुरुवातीच्या काळात फियाट, अँबेसिडर या गाड्यांचा रुबाब तो सांगतो.पूर्वीचे गाडीचे मालक देखील गाडीला जपायचे हा अनुभव त्याने अनुभवला आहे.सुरवातीच्या काळात या प्रकारच्या रंग कामासाठी २ -२ महिने जायचे. गाडी नीट ठेवली नसेल,गाडीच्या पत्र्याला गंज चढला असेल तर गाडीचे बॉडी काम करताना पत्र्याचे पॅच मारावे लागत. गाडी रफ असेल तर पूर्वी २० ते ३० किलो लांबी भरून घेत. गाडी घासून घेणे,आलेली पापडी एकसा ब्लेडने काढणे,निरमा पाणी घेऊन वाटरपेपरचा उपयोग करणे ,रेड ऑक्साईड लावणे ते सुकणे, सुकल्यावर -४ दिवसानी पुन्हा ६ इंची व ५ इंची पत्र्याने लांबी लावणे, खड्डे व्यवस्थित बुजवून घेणे,पुनःपुन्हा
लांबी भरून खड्डे कव्हर करणे,लेवल पाहणे,ठोकळ्यानी फिरवणे, लांबी कटिंग करणे, पुन्हा गाडी धुणे-धूतल्यावर चरे भरून घेणे ,पातळ हातदेणे, पुन्हा सुकायला ठेवणे,लांबी सुकल्यावर वाटर पेपरने घासून फिनिशिंग करणे, कलर थिनर टाकून फिनिशिंग करणे, प्रायमर वापरणे,टच अप काढणे, स्पॉटपट्टी चेक करणे, कलरला धूळ वारा लागू नये याची काळजी घेणे, इत्यादी जुन्या काळात ऑटो स्प्रे कलर कसा दिला जात होता याची माहिती येते. अनुभव नसलेल्या वाचकाला हे सारे नवीन आहे,पण जे या व्यवसायात काम करतात त्यांना मात्र
हा काम कसे बारकाव्याने केले जाते याचे मार्गदर्शन केले जाते. हे पुस्तक म्हणजे ऑटो स्प्रे पेंटिंग कसे करावे त्याची वाट दाखवणारा मार्गदर्शक वाटाड्या आहे. पेंटीग व्यवसायात स्वतःचे शरीर व आरोग्य याची काळजी घ्या ,डबल फिल्टर वाला मास्क चांगल्या दर्जाचा वापरा, रंगांचा गॅस हा श्वास नलिकेत जाऊ नये याची काळजी घ्या. तसेच मास्क वापरू नका. वापराल तर अस्थमा होईल ,हँडग्लोज वापरा, वाटर पेपरची धार हाताच्या त्वचेला लागणार नाही याची काळजी घ्या, ग्राईडिंग करताना सेफ्टी गॉगल वापरा,डोळे सुरक्षित ठेवा, वर्कशॉप स्वच्छ ठेवा,फायबर पार्ट,बॉक्स पुठ्ठे मास्क कसेही टाकू नका, रंगाचे डबे कोंदट जागेत न ठेवता मोकळ्या हवेशीर जागेत ठेवा, वेळोवेळी वायरिंग तपासा,शॉर्टसर्किट होऊ नये याची काळजी घ्या,अग्निशामक पंप ठेवा, वाळूने भरलेल्या बकेट ठेवा. हाताला लागलेला कलर थिनरने साफ करा,निरमा किंवा साबणाने हात स्वच्छ धुवा, इत्यादी सुरक्षेची माहिती तपशीलवार दिल्याने लेखकाने खूप आत्मीयतेने या क्षेत्रात काम करणाऱ्याची काळजी घेतल्याचे जाणवते. डेटिंग व पेंटीग करणारया दोघात समजूतदार पणा हवा, लाईन व लेवलची कामे दोघांनी समन्वयाने करायला हवीत असा सदुपदेश इथे मिळतो. अशा कितीतरी लहान लहान सूचना अनुभवाने शोधून त्यांनी सांगितल्या
आहेत.कामाचे उत्तम निरीक्षण,जबाबदारी,गांभीर्य या बाबी स्वतः सचिनमध्ये असल्याने कोणीही थोडासुद्धा हलगर्जीपणा करू नये याकडे त्यांचा कटाक्ष दिसतो. मला सर्वात आवडलेली गोष्ट ही की लोक आपल्याला चांगली माहिती असेल तर ती दुसऱ्याला सांगत नाहीत ,पण सचिन अवघडे मनाने देखील मोकळे आणि इतरांची काळजी घेणारे असल्याने त्यांच्या या पुस्तकात लेखकाचा स्वभाव देखील आपल्याला दिसतो. एक प्रकारची विनम्रता त्यांच्या लेखनाच्या तळाशी असल्याचे मला जाणवत आहे. सांगण्याची भाषा ही ओघवती आणि मवाळ, आपली वाटेल अशीच आहे.शब्दांचा नेमका वापर करून नेमका आशय प्रकट करीत लेखक आपल्याशी जणू बोलतो आहे.त्यात कुठलीही आढ्यता मला जाणवली नाही. सुरक्षा विषयक धोके सांगताना स्वतःचे बाबतीत घडलेल्या घटनात्यांनी सांगितल्या आहेत. सचिनच्या या प्रकारच्या व्यवसायातून त्यांच्या अभिव्यक्तीतून देखील एक तत्वज्ञान उभे राहते.ते किती नेमकेपणाने लिहितात पहा.
‘’ पेंटीग हे काम अतिशय चांगलं आहे.शांतपणे डोकं लावून आपल्या अनुभवाचा
कौशल्याचा वापर करून मेहनतीनं केलेल्या कामाचं समाधान स्वतः पेंटरला
मिळते.त्यात एक वेगळाच आनंद असतो.कलरबद्दल सर्वांनाच आवड असते.
आपण कोणतीही वस्तू विकत घ्यायला गेलो तर ज्या वस्तूचा कलर चांगला आहे
,तीच वस्तू आपण खरेदी करतो. म्हणजेच काय तर कलर किंवा रंगाबद्दल माणूस
जातीला आकर्षण आहे.जो पेंटर कलरचे काम चांगले करतो,त्याच्याकडे कामे
जास्त असतात.लोक खात्रीने गाडी पेंटीगला सोडतात.व इतरही आपल्या
कामाबद्दल चांगला रिपोर्ट देतात तसेच स्तुती करतात. असे अनेक लोकाकडून
नाव निघू लागले तर आपले गुड विल,नावलौकिक वाढत जातो.चांगले काम
करण्याचा फायदा हा असतो.’’

या त्यांच्या लेखनात व्यवसायनिष्ठा आहे ,कर्तव्यनिष्ठा आहे.अनुभवातून आलेले
तत्वज्ञान आहे.कोणत्याही व्यवसाय करणाऱ्या माणसाला हे लागू होते.
विश्वासाने काम करण्याची प्रेरणा,आणि ज्या मालकाने गाडी सोडली त्या
मालकाबद्दलचा आदर यात स्पष्ट दिसतो.अनेक व्यावसायिक हे ग्राहकांची
काळजी घेत नाहीत. परफेक्ट काम करून देण्याचा ,सौंदर्य निर्माण करण्याचा
ध्यास सचिन यांच्या या सगळ्या शब्दात उतरला आहे .हा प्रामाणिकपणाचा
भाग हे या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.कामगार नुसता कामगार नसावा,तो विश्वासू
,कौशल्य असलेला,सावधान असलेला,सहकारी यांच्याशी विचारपूर्वक समन्वय
साधून काम करणारा असावा. खोटेपणाला,उतावीळ होण्याला ,गडबडीने काम
करून देण्याला इथे अजिबात थारा नाही.सचिनने या पुढेही या व्यवसायात
निर्व्यसनी राहणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.व्यसनाने कामात
व्यत्यय,आरोग्याची हानी,अपघात आणि नुकसान होण्याची शक्यता असते.
सगळ्यात महत्वाचे ते हे अशा व्यसनी माणसांच्यामुळे आपली पत कमी होते.
निर्व्यसनी आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याची आचार संहिता
सचिन सांगतात ,तेंव्हा मला ते किती काळजीने हे पुस्तक लिहित आहेत याची
जाणीव होते.
ऑटोपेंटीगसाठी लागणाऱ्या साधनांची माहिती देऊन त्याचा उपयोग कसा
करावा हे देखील सविस्तर या पुस्तकात सांगितले आहे. एअर कोम्प्रेसर, एअर
फिल्टर,रेगुलेटर,स्प्रे गन तिचे विभाग,तिच्या जोडणीची सचित्र माहिती या
पुस्तकात येते.लांबी पत्रा,सेंडर,ड्राय सेन्डिंग ,ब्लॉक ठोकळे,कसे वापरावेत हे सर्व
सांगितले आहे.एकसा ब्लेड ,स्टीलची पट्टी ,टेपिंग मास्किंग ,trag
rack,अंडरबॉडी गन,पोलीश मशीन यांचीही सचित्र माहिती दिलेली आहे.
लांबी,पुट्टी त्यांचे प्रकार व ते कोणत्या वेळी कसे वापरायचे याची बारकाव्याने
माहिती दिली आहेच पण पूर्वीची व आताची लांबी याची तुलना केली आहे.
आपल्या सारख्याला प्रायमर एकच असतो, असे वाटते ,पण त्याचे प्रकार त्यांनी
सांगितले आहेत. रेड ऑक्साईड,NCPS GRAY ,वन के प्रायमर ,एच .एस
.प्रायमर ,पी.पी.प्रायमर यांचा उपयोग कोणत्या वेळी करावा हे सांगितले आहे.
गाडी जेंव्हा पेंटीगसाठी येते तेंव्हा पूर्वीचा कलर कसा काढावा,किती
काढावा,कलर जाळून काढू नये ही महत्वाची सूचना ते देतात.कास्टिंग सोड्याचा
वापर करून कलर काढण्याची पद्धत देखील व्यवस्थित सांगितली आहे.रंग व
त्याचे प्रकार त्यांनी सविस्तर प्रकरण लिहून सांगितले आहेत. गाडी मालकाच्या

मागणीनुसार कलर निवडले जातात. कंपन्यांनी दर्जानुसार स्वस्त महाग किंमती
ठेवलेल्या आहेत. जलद सुकणारा इनामल, कलर आणि त्यांचे भाऊबंद, कलर
मिक्स होताना कुणाशी त्यांचे जुळते कुणाशी नाही ,याची माहिती वाचकांना
झाल्याने ज्ञानात भर पडते. एन.सी.कलर हा आईसारखा मवाळ असतो ही
उपमा सचिन देतो तेंव्हा तो साहित्यिक आहेच हे लक्षात येते.एन.सी.कलर हा
मऊ,चिवट ,व जलद सुकणारा असल्याने काम वेगाने उरकते असा अनुभव सचिन
सांगतो. आई जशी सर्वच मुलावर प्रेम करते आणि सर्वाना समजून घेते तसा हा
कलर त्यास वाटतो. .म्हणूनच आईसारखा प्रेमळ कलर,समर्पित होणारा कलर हा
असावा असे वाटते.त्यागी कलर आहे. कलरच्या गुणासाठी आईच्या गुणाची
उपमा देणे हे विशेष आहे. PU कलर मध्ये दोन तीन प्रकार आढळतात.
दर्जानुसार त्याचे वेगळेपण आहे.शेड तयार करण्याची पद्धत देखील सांगितली
आहे.PU कलर शायनिंग चांगले देतो असा हा कलर आहे.मेटालिक कलर मारत
असताना हलक्या हाताने स्प्रे गन ट्रिगर का चालवावा हे देखील सांगितले आहे.
थ्री कोट ,रेड व ब्लू कलर देताना काय काळजी घ्यावी हे उत्तम सांगितले आहे.
गाडीचा पत्रा गंजू नये म्हणून रबर पेंट दिला जातो.तो जाड थर का असावा याचे
चांगले विवेचन केले आहे. रबर पेंटचे वैशिष्ट्य सांगताना त्याचा थर सुकत नाही
त्याला हवा लागली की तो पापुद्रा येतो त्याचेसाठी लेखकाने उदाहरण किती
सुंदर दिलेय पहा.
‘’गरम दुधावर साय येते.त्या साईला हात लावल्यास हात ओला होत नाही व
दुध हाताला लागत नाही ,त्या सारखा अंडर बोडी पेंट आतून ओला असतो पण
तो हाताला लागत नाही.व पेंटच्या ओलेपणामुळे पत्रा लवकर गंजत नाही.
अशाच प्रकारे लूज थिनर,पॅक थिनर यांचा उपयोग, माहिती दिली
आहे.कोटिंगचा उपयोग रंगाची चमक वाढविते.प्लास्टिक कोटिंग बाबत अनेक
गुंते आहेत त्याची व्यवस्थित माहिती त्यांनी दिली आहे. वाटरपेपरचे पेंटीग
व्यवसायातील महत्व ते सांगतात पेपरची दुमती घडी करून पेपर कसा
वापरावा ही माहिती आहेच ८० नंबरच्या पेपर पासून २५०० नंबरच्या पेपरची
वैशिष्ट्ये व त्यांची तुलना करीत त्यांचा उपयोग त्यांनी स्पष्ट केलेला आढळतो.
ड्रायसेंडीग पेपर ,ड्राय सेन्दिग पौलिस्टर पुट्टी घासणारे पेपर ,पेपरचे प्रकार व
उपयोग व्यवस्थित समजावून सांगितले आहेत. कलर क्वालिटीक्रम कलरच्या
प्रकारानुसार आलेख पद्धतीने दाखवले आहेत.जिथे पेंट द्यायचा त्या जागेला पेंट
बूथ असे म्हणतात .इथे कोणत्याही प्रकारची धूळ येणार नाही याची काळजी

घेण्याविषयी सविस्तर माहिती लेखक देतात.स्वच्छतेचे महत्व ,एकाग्र चित्ताने
कलर काम करणे ,इतरांना कोणताही अपय होणार नाही याची काळजी घेणे
,पुरेसा उजेड बूथ मध्ये असणे ,पेंट बूथ नेहमी बंद ठेवणे ,कामाच्या वेळेतच तो
वापरणे या वेळी मास्क लावणे इत्यादी सूचना फायनल कलरचे काम करताना
देखील पुनःपुन्हा दिल्या आहेत. गाडीच्या बॉडी पार्टची नावे देखील दिली आहेत
.सचित्र माहिती असल्याने लगेच आकलन होते . याच प्रकारे गाडीच्या फुल पेंट
क्रियेची माहिती खूपच सविस्तर दिली गेली आहे. तसेच नव्या गाडीचा चेप
काढण्यासाठी डेटिंग करणे ,पुट्टी भरणे ,टेपिंग करणे व नंतरच कलर मारणे
,प्लास्टिक कोटिंग करणे ही माहिती सचित्र दिलेली आहे. प्लास्टिक ,फायबर
पार्टचे पेंटिंग ,नाविन्यपूर्ण बदल करत असताना मदत गार्ड व हेडलाईट कोटिंग
ही देखील माहिती जाणीवेने दिलेली आहे.
‘वाटचाल सक्षम ऑटो स्प्रे पेंटर घडविण्याची ‘ हे नुसते पुस्तक नसून ऑटो स्प्रे
पेंटीग क्षेत्रातील सक्षम पेंटर घडवणारा ज्ञानग्रंथ आहे. सचिन अवघडे या माहुली.
जिल्हा -सांगली या गावातील कष्टाळू आणि प्रामाणिक असणारया, ७ वी पर्यंत
शिकलेल्या विद्यार्थ्याने आपल्या लहानपणी आई वडिलांना गरिबीच्या काळात
स्वतः रोजगारास जाऊन, कष्ट करून साथ दिली.आपल्या चुलतभावाने
कामासाठी कराडला बोलावून घेतल्यावर ऑटो स्प्रे पेंटीग या व्यवसायात
मनापासून काम केले. या काळात प्रामाणिकपणा,सचोटी,विश्वास, विनम्रता,
प्रेमळपणा, निर्व्यसनी जीवन, कार्यमग्नता,एकाग्रता,सामाजिक बांधिलकी इत्यादी
मुल्ये जीवनात घेऊन व्यवसायात देखील उत्तम कौशल्ये घेऊन ग्राहकांचे
समाधान केले. रंगासारख्या रासायनिक गोष्टीचे काम करत असताना आपण
सावधान असायला पाहिजे ,दक्ष रहायला पाहिजे ही जाणीव देत हे पुस्तक
नवोदिताची काळजी घेते. कामाची जागा स्वच्छ व नेटनेटकी पाहिजे आणि
आपल्या आरोग्याची सतत काळजी घेतली पाहिजे हे जसे या ग्रंथात सांगितले
जाते तसे तुमच्या चांगल्या कामाने तुमचे गुडविल म्हणजेच नावलौकिक झाला
पाहिजे असे काम करण्याची अपेक्षा केली आहे. ग्राहकाचा विश्वासघात होणार
नाही असे वर्तन आपले असले पाहिजे. ग्रामीण भागातील एका निष्ठावंत
कामगाराने लिहिलेला हा मार्गदर्शक कौशल्यग्रंथ अनेकविध क्षेत्रातील
कामगारांना आपले अनुभवकथन लिहिण्यास प्रेरणा देणारा आहे. तिसऱ्या
जगातील जीवनाचे,अनुभवाचे संचित लोकांना ग्रंथरूपाने मिळत गेले तर
येणाऱ्या काळात एक जागरूक कामगार शक्ती निर्माण होईल आणि साहित्यात

कष्टाळू ,विश्वासू लोकांचा साहित्य प्रवाह निर्माण होईल.सचिन अवघडे यांनी
आत्मीय कळकळीने आपले अनुभवातून आलेले हे कौशल्य ज्ञान शब्दात व्यक्त
करून अनेकापर्यंत पोचते केल्याबद्दल सर्वांनी सचिन अवघडे यांचे पुस्तक
घेऊनच अभिनंदन करावे .

प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
मराठी विभाग प्रमुख
छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा [स्वायत्त ]
९८९०७२६४४०


Back to top button
Don`t copy text!