
स्थैर्य, सातारा, दि. २६ जून : जिल्ह्यातील सर्व तालुके आणि गाव पातळीवर सर्वेक्षण करून धोकादायक ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या, उघडे डीपी (D.P.) आणि फ्यूज बॉक्स तातडीने दुरुस्त करावेत, असे सक्त निर्देश अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी महावितरणला दिले आहेत. तसेच, मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करून येत्या आठ दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ‘ग्राहक संरक्षण परिषदेची’ बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करून प्रशासकीय विभागांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीतील प्रमुख मुद्दे आणि प्रशासनाला दिलेल्या सूचना:
-
महावितरणची मान्सूनपूर्व कामे: वीजपुरवठा खंडित होऊ नये आणि सुरळीत राहावा, या दृष्टीने करावयाची सर्व मान्सूनपूर्व कामे महावितरणने प्राधान्याने पूर्ण करावीत.
-
गटारे व पाणी साचण्याचा प्रश्न: बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील अपूर्ण गटारांची कामे ग्रामपंचायत विभागाने तातडीने पूर्ण करावीत. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचणार नाही, याची खात्री करावी.
-
वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण: सातारा शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू आहे. वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी नगरपालिका, शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) यांनी एकत्रित बैठक घेऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.
-
रिक्षांना मीटर सक्ती: परिवहन विभागाने रिक्षा संघटना आणि ग्राहक परिषद यांची संयुक्त बैठक घेऊन शहरातील सर्व रिक्षांना मीटर बसवण्याबाबतची कार्यवाही तत्काळ करावी.
अहवाल सादर करण्याचे निर्देश:
बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या वरील सर्व प्रश्नांबाबत संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे निर्देशही श्री. इनामदार यांनी यावेळी दिले.
या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी व ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिव वैशाली राजमाने यांच्यासह परिषदेचे सदस्य आणि संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.