फलटण: गुणवरेत गांजा लागवडीवर कारवाई – एका संशयितावर गुन्हा दाखल

फलटण तालुक्यातील गुणवरे येथे बेकायदेशीर गांजा लागवडीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. यात ३४ हजारांचा गांजा जप्त करून एका संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २६ जून : फलटण तालुक्यातील गुणवरे येथील घुलेवस्तीमध्ये एका घराजवळ बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या गांजा लागवडीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. २५ जून रोजी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली असून एका संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या मोहिमेअंतर्गत गुणवरे गावात एका घराजवळ गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने घुलेवस्ती येथे छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी ३४ हजार ६५० रुपये किमतीची आणि ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे हस्तगत केली आहेत. या प्रकरणी संशयित आरोपी अंकुश रामचंद्र कोळेकर (रा. गुणवरे, ता. फलटण) याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे आणि पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सुबनावळ, शिवानी नागवडे, संतोष मठपती, शांतीलाल ओंबासे, योगेश रणपिसे, सागर अभंग, तुषार नलवडे, अमोल देशमुख आणि अविनाश शिंदे यांच्या पथकाने केली.

Back to top button
Don`t copy text!