दैनिक स्थैर्य । दि. २६ एप्रिल २०२३ । मुंबई । राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. जलशक्ती मंत्रालयाने पहिल्यांदाच भारतीय जलसंस्थांची गणना करुन एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालाात जलसंधारण योजना सर्वाधिक प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात यशस्वी ठरलेल्या राज्यांचा समावेश आहे. देशभरातील राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण! जलशक्ती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या जलसंधारणाच्या पहिल्या जनगणनेच्या अहवालानुसार जलसंधारण योजना मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वीपणे राबवण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्राला पाण्याची समस्या यापुढे जाणवणार नाही
देशात सर्वाधिक जलसंधारणाच्या योजना महाराष्ट्राने राबविल्या आहेत. महाराष्ट्राला पाण्याची समस्या यापुढे जाणवणार नाही याबद्दल महायुती सरकार कटिबद्ध असून त्यास अनुसरून विविध योजना देखील यशस्वीपणे सरकार राबवित आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
दरम्यान, जलशक्ती मंत्रालयाच्या पहिल्यावहिल्या देशव्यापी जलसंधारण गणनेत महाराष्ट्रात एकूण ९७,०६२ जलस्रोतांची आढळून आले आहेत. त्यापैकी ९६,३४३ ग्रामीण भागात आणि फक्त ७१९ शहरी भागात आहेत. राज्यातील सर्व जलस्रोतांपैकी ७७ टक्के भूजल पुनर्भरणासाठी वापरले जातात. औरंगाबाद, नाशिक आणि जालना हे तीन जिल्ह्यांचा समावेश सर्वाधिक पुनर्भरण संरचनांसह भारतातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. तर आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि उत्तर प्रदेशातील सीतापूर हे त्याखालोखाल दोन जिल्हे आहेत.