‘व्हॉइस ऑफ मीडिया’ संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन आज व उद्या बारामतीत


दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२३ | बारामती |
‘व्हॉइस ऑफ मीडिया’ संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन आज, शनिवार, दि. १८ व रविवार दि. १९ नोव्हेंबर रोजी बारामतीत पार पडत आहे. बारामतीतील गदिमा सभागृहात हे अधिवेशन होत असून त्यामध्ये जवळपास दीड हजार पत्रकार व पदाधिकारी हजेरी लावणार आहेत. दरम्यान, या अधिवेशनाच्या तयारीचा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आढावा घेऊन निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, बैठक व्यवस्था आदींची पाहणी केली.

बारामतीत नुकतेच ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संपादक संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, राज्य कोअर टीमचे सदस्य अरुण जैन, पत्रकार मिलिंद संगई, विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर बाहेकर, बारामतीचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी बारामतीतील अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला.

राज्यभरातून अधिवेशनासाठी येणार्‍या पत्रकारांची निवास, भोजन आदी व्यवस्था यासाठी विविध ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर गदिमा सभागृहात कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दृष्टीने बैठकही पार पडली. या बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या वेळेचे नियोजन, प्रत्येक विषयाची स्वतंत्र जबाबदारी, विविध सत्रांची आखणी, मान्यवरांच्या निवास व इतर व्यवस्था याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या अधिवेशनाला उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पत्रकारांना पेन्शन, आरोग्य, हक्काची घरे, प्रत्येक तालुका स्तरावर पत्रकार भवन, पत्रकारांना पेन्शन, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, आरोग्य आदी विषयांवर काम करण्याची योजना आखली जात आहे.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे बारामतीत राज्याचे शिखर अधिवेशन होत आहे. देशातील सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष या अधिवेशनाच्या निमित्ताने बारामतीमध्ये येणार आहेत. पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी, नव्याने विकसित होत असलेल्या पत्रकारितेच्या तंत्रज्ञानासाठी या अधिवेशनामध्ये चर्चाविनिमय होणार आहे. यात काही ठराव घेतले जाणार आहेत, जे राज्य आणि केंद्र सरकारला दिले जाणार आहेत. अधिवेशनाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!