
राज्यात पावसाने विश्रांती घेतलेली असताना आता १३ ते १७ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा नवीन अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०७ सप्टेंबर : राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली असताना आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. १३ ते १७ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून, विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात पावसाचा जोर वाढेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांसाठी सप्टेंबरचा पाऊस महत्त्वाचा
राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या तुलनेत १४.७ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका या पिकांच्या वाढीचा काळ असल्याने हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पाऊस कमी झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
पंजाबराव डख यांच्या अंदाजासोबतच भारतीय हवामान विभागानेही (IMD) राज्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.