
सण-उत्सवांत सार्वजनिक अन्नवाटपासाठी एफडीएच्या परवान्याची सक्ती नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट करत अन्नसुरक्षेसाठी विशेष मोहीम जाहीर केली.
स्थैर्य, सातारा, दि. ०७ सप्टेंबर : सण-उत्सवांच्या काळात भंडारा, प्रसाद किंवा सार्वजनिक अन्नवाटपासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी सक्तीची असल्याच्या चर्चेवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. एफडीएच्या या आदेशाचा उद्देश उत्सवांवर कोणतेही निर्बंध लादणे नसून, कार्यक्रमांमध्ये नागरिकांना दिले जाणारे अन्न सुरक्षित आणि भेसळमुक्त राहावे हा आहे. यासाठी एफडीएने वर्षभर लागू राहणारी कार्यपद्धती आणि कॅलेंडर तयार केले आहे.
नवीन कायदा किंवा परवाना पद्धत नाही
तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, या आदेशामुळे कोणताही नवीन कायदा किंवा नवी परवाना व्यवस्था लागू झालेली नाही. अन्न व्यावसायिकांच्या नोंदणी व परवान्याबाबतच्या तरतुदी २०११ पासून अस्तित्वात आहेत. या नियमांची सातत्याने आणि समान पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गणेशोत्सव, धार्मिक कार्यक्रम किंवा महाप्रसादावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.
आयोजक आणि अन्नविक्रेत्यांची जबाबदारी
मोठ्या प्रमाणावर अन्न तयार केले जात असल्याने केटरर्स, अन्न व्यावसायिक आणि कार्यक्रम आयोजकांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत. अन्नाची गुणवत्ता राखणे आणि भेसळ रोखणे यावर प्रशासनाचा भर आहे. सण-उत्सव परंपरेनुसार साजरे करतानाच नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी एफडीएने तपासण्या आणि कारवाया तीव्र केल्या आहेत.