ऐतिहासिक महादरे आणि हत्ती तलाव परिसराचे सुशोभीकरण होणार; २८ एकरांवर उभारणार बगीचा व विरंगुळा केंद्र


 सातारा नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियानातून मिळालेल्या ६ कोटींच्या निधीतून ऐतिहासिक महादरे व हत्ती तलाव परिसराचा विकास केला जाणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जागेची पाहणी करत प्रकल्पाची माहिती दिली.

स्थैर्य, सातारा, दि. २१ : सातारा नगरपालिकेच्या मालकीच्या ऐतिहासिक महादरे तलाव व हत्ती तलाव परिसराचा लवकरच कायापालट होणार आहे. सुमारे २८ एकर जागेवर हा भव्य प्रकल्प हाती घेण्यात येणार असून, त्यामध्ये सुंदर बगीचा आणि नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सकाळी या नियोजित कामाच्या जागेची पाहणी केली आणि प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. डी. जी. बनकर, गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, शहर नियोजन सभापती अशोक शेडगे, नगरसेविका मुक्ता लेवे, मुख्याधिकारी विनोद जळक, नगर अभियंता दिलीप चिद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

‘माझी वसुंधरा’च्या ६ कोटींच्या निधीतून विकास

सातारा पालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत ६ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. या निधीतून महादरे व हत्ती तळे परिसरातील पालिकेच्या मालकीच्या २८ एकर जागेवर हा विकास प्रकल्प राबवला जाणार आहे. नागरिकांच्या मागणीनुसार येथे बगीचा विकसित केला जाईल. नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचा उपयोग करून हा प्रकल्प एकूण तीन टप्प्यांत पूर्णत्वास नेला जाणार आहे.

पर्यटनाला मिळणार मोठी चालना

या परिसराचा पर्यटनवाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. शहराची हद्दवाढ झाल्यामुळे हा परिसर आता पालिका कार्यक्षेत्रात आला आहे. नियोजित ‘रिंगरोड’ याच परिसरामधून कास रोडला जोडून जाणार असल्याने प्रवासी आणि पर्यटकांना या प्रकल्पाला भेट देणे अधिक सोयीचे होईल. दळणवळणाची चांगली सोय झाल्यामुळे शहरवासीयांसाठी आणि लहान मुलांसाठी एक उत्तम विरंगुळा केंद्र निर्माण होईल.

‘दरे’ गावात फुलपाखरांचे संवर्धन

‘फुलपाखरांचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या दरे गावातील डोंगर परिसरात फुलपाखरांचे संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. पर्यावरण तज्ज्ञ आणि फुलपाखरांवर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांच्या मदतीने हा परिसर विकसित करून त्याला प्रसिद्धी दिली जाईल, असेही ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

वणवे रोखण्यासाठी ‘जाळपट्टे’ तयार करण्याच्या सक्त सूचना

दरे परिसरात लागणाऱ्या वणव्यांमुळे फुलपाखरांच्या अस्तित्वावर निर्माण होणाऱ्या धोक्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. “वणवा लावल्यानंतर गवत चांगले येते, ही जुनाट मानसिकता लोकांनी बदलायला हवी. हे वणवे नैसर्गिक नसून दुर्दैवाने ते जाणूनबुजून लावले जातात, हे प्रकार तत्काळ बंद झाले पाहिजेत. यामुळे वन्यप्राण्यांसह नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होतो. हे प्रकार रोखण्यासाठी सातारा पालिकेने अग्निशमन यंत्रणा कायम तैनात ठेवावी. तसेच, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर अजिंक्यतारा किल्ला व परिसरात ‘जाळपट्टे’ (Fire Lines) तयार करून वणव्यांना अटकाव करावा,” अशा सक्त सूचना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी वन विभाग आणि पालिकेला दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!