
स्थैर्य, फलटण, दि.१०: सातारा जिल्ह्यामध्ये औद्योगिक वसाहतींमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कंपन्या, सर्व साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकरी,ऊस तोड कामगार व इतर सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी व त्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या संपुर्ण कुटुंबाला कोरोना म्हणजेच कोव्हीड १९ चा विमा कवच मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे समन्वयक व युवा नेते महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी एका निवेदनाद्वारे महसुलमंत्री व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये विविध कर्मचारी विविध पदांवर काम करत असतात. या पदांवर काम करत असताना जर कोणाला कोरोनाची लागण झाली तर तो खर्च त्यांना पेलवणारा नसतो व त्यावेळी संपूर्ण कुटुंबाची ससेहोलपट होते. अशा मध्ये कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून, या सर्व कंपन्यांनी आपल्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांना व आपल्याकडील कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विमा कवच दिले पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी केलेली आहे.