
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँक व्यवस्थापनाचा ऐतिहासिक निर्णय : कर्मचारी विम्याचा प्रिमियम ८४ लाख ” एल.आय.सी” कडे सुपूर्द
स्थैर्य, सातारा, दि. ०६ : सध्याच्या धकाधकीच्या आणि संसर्गाच्या वातावरणामध्ये बँकेचे कर्मचारी ग्राहकाना अविरतपणे बँकिंग सेवा देण्याचे काम करीत असून त्यांना विमा संरक्षण असणे गरजेचे आहे. याचसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचारी सुरक्षा आणि त्यांचे कुटुंबीयांच्या भविष्याच्या दृष्टीने बँकचे कर्मचाऱ्याना “जीवन विमा संरक्षण” देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. कर्मचारी आयुर्विमा संरक्षण योजनेचा शुभारंभ बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने यांचे शुभहस्ते एलआयसी चे अधिकारी यांना बँकेच्या सेवक कल्याण निधी मधून विमा प्रिमियम रू.८३.८३ लाखाचा धनादेश देवून करण्यात आला.
सध्या कोरोना महामारीच्या काळात नोटा, इतर कागदपत्र यांची देवाणघेवाण, ग्राहकांशी सततचा थेट संपर्क यामुळे बँकेचे बरेच कर्मचारी कोरोना बाधित होऊन त्यांची जोखीम वाढली आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने कर्मचारी हिताचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने यांनी याप्रसंगी सांगितले.
एलआयसी चे सातारा विभागाचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक ललित कुमार वर्मा म्हणाले सातारा जिल्हा बँकेने कर्मचारी हित डोळ्यासमोर ठेवून राबविलेल्या विमा योजना प्रशंसनीय असून बँकेने भविष्याचा वेध घेत उचललेले हे अत्यंत महत्वाचे पाऊल सहकारी बँकिंग क्षेत्राला दिशादर्शक आहे.
या पॉलिसी अंतर्गतबँक कर्मचाऱ्याना या पुर्वी असलेल्या विमा संरक्षणा व्यतिरिक्त अधिकचे १० लाखापर्यंत जीवन विमा संरक्षण प्राप्त होणार आहे. बँकेचे संचालक मंडळाने कर्मचाऱ्यासाठी यापूर्वी अशा प्रकारच्या इतरही विमा योजना कार्यान्वित केलेल्या आहेत .त्यामुळे आता बँक कर्मचाऱ्याचा कोणत्याही कारणाने नैसर्गिक मृत्यू झाल्यास एकूण रू.२३ लाखापर्यंत आणि अपघाती मृत्यू झाल्यास एकूण रू. २९ लाखापर्यंत आर्थिक मदत वारसाला प्राप्त होणार आहे. याशिवाय बँक कर्मचारी यांच्या जिल्हा बँक स्टाफ सोसायटी व कृषी बँक कर्मचारी सोसायटी या दोन पतसंस्थांच्या माध्यमातून संस्था सभासद कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास दोन्ही संस्थेकडून एकत्रित ८ लाख मदत दिली जाते. त्याचप्रमाणे PMSBY व PMJJBY विमा योजनेतून प्रत्येकी रु.२ लाख आणि बँकेने सुरु केलेल्या “सातारा जिल्हा बँक सॅलरी पॅकेज” योजने अंतर्गत रू.३० लाखापर्यंत अपघात विमा संरक्षण मिळणार आहे.
यामुळे वरील सर्व योजनांचा विचार करता बँक कर्मचाऱ्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास एकत्रित रू.३३ लाखापर्यंत आणि अपघाती मृत्यू झाल्यास एकत्रित रू. ६९ लाखापर्यंत आर्थिक मदत वारसाला प्राप्त होणार आहे. अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली.
याप्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक, राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे. बिगरशेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक वाय. जे. साळुंखे, उपव्यवस्थापक महेश शिंदे, एलआयसी पेन्शन व समूह विमा सातारा शाखेचे व्यवस्थापक संतोष गायकवाड, उपव्यवस्थापक प्रदीप शिंगटे, बँकेचे अधिकारी व सेवक उपस्थित होते. बँकेने सेवकांची ग्रुप आयुर्विमा पॉलिसी घेतलेने बँक सेवकांनी समाधान व्यक्त केले आहे.