दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२३ । सातारा । महसूल सप्ताहामध्ये दुर्गम भागात जाऊन लोकांचे अर्ज, प्रस्ताव जमा करावेत आणि मोहीम घेऊन 15 ऑगस्ट पर्यंत या सर्व अर्जांचा निपटारा करावा. सातारा जिल्हा शासकीय योजनांच्या अंमलबजावणींमध्ये नेहमीच आदर्श राहिला आहे. गावपातळीपर्यंतची आपली यंत्रणा अत्यंत सक्षम आहे. यापुढेही साताऱ्याचा हाच आदर्श आपण पुढे घेऊन जाऊया. संपूर्ण महसूल विभाग म्हणून आपण एक कुटुंबत्वाची भावना जपत समन्वयाने, सकारात्मक दृष्टिकोनातून काम करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
महसूल दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी महसूल सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, उपजिल्हाधिकारी विजय यादव, शिवाजी जगताप, उपविभागीय अधिकारी सुनील गाडे, सुधाकर भोसले, अभिजीत नाईक, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, आजचा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा गतिमान काळ आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. आपल्याकडे काम घेऊन लोक येणे हा काळ मागे पडत चालला असून आपण प्रशासकीय यंत्रणांनी लोकांकडे पोहोचणे अपेक्षित आहे. लोकांच्या घरापर्यंत माहिती आणि सेवा पोहोचली पाहिजे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांनी अंगीकार करणे आवश्यक आहे. ई हक, ई चावडी, ई फेरफार या सेवा नागरिकांपर्यंत, सामान्य शेतकऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवा. 15 ऑगस्ट पासून महसूल विभागाकडील सर्व वसुली ही ई चावडी प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे. आपल्या विभागाकडे येणा-या अर्जांचा निपटारा आठवड्याभरात व्हावा, अर्जदाराला त्याच्या कामाबाबत लेखी उत्तर देण्यात यावे, यातून आपली पारदर्शकता तर दिसेलच पण लोकांमधून संभ्रम दूर होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयात ई ऑफीस प्रणाली सुरू करण्यात येत आहे, त्यामुळे लोकांना त्यांच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी हेलपाटे मारण्याची गरज नाही. घरी बसूनही ते आपल्या कामाची स्थिती पाहू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर महसूल विभागातील प्रत्येक कार्यालयाने करावा, असे सांगून जिल्हाधिकारी डुडी यांनी आपल्या जिल्ह्यात पर्यटन आणि कृषी या दोन क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीची फार मोठी क्षमता आहे या क्षेत्रांना चालना देवून सामान्य नागरिकांचे उत्पन्न अधिक पटीने वाढविण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन केले.
अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील दुवा आहे. नैसर्गिक आपत्ती असू की निवडणूक सर्व स्थितीत अखंड अव्याहत सेवा पुरविणारा हा विभाग आहे. स्वातंत्र पूर्व काळात न्यायदान, जमावबंदी कायदा, सुव्यवस्था, शेतसारा अशी कामे हा विभाग करत असे. स्वातंत्र्यानंतर यासह अन्य अतिरिक्त जबाबदाऱ्या आपण पार पाडत आहोत. उपलब्ध मनुष्यबळ व साधने यांचा पुरेपुर वापर करत आपण सर्व जबाबदाऱ्या कर्तव्य भावनेने पार पाडत आलो आहोत. 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीतही महसुल सप्ताह शासनाच्या निर्देशानुसार आपण यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपजिल्हाधिकारी भूसंपादन शिवाजी जगताप, तहसिलदार -रमेश पाटील, अमर रसाळ, नायब तहसलिदार- दयानंद कोळकर, वैशाली जायगुडे, अव्वल कारकून महेश गंगातीरकर, अनिल जाधव, रंजित जाधव, संदिप जगदाळे, मंडळ अधिकारी विजय जाधव, लालासाहेब साळुंके, भरत कर्णे, तलाठी लक्ष्मण अहिवळे, एस.जी. बोबडे, फिरोज आंबेकरी, गणेश भगत, महसूल सहायक- धनाजी फडतरे, टी.एस. मुल्ला, सागर यादव, राजेश माने, दत्ता शिरसाट, दिपक कांबळे, लघुटंकलेखक रमेश शिंदे, वाहनचालक महेश शिंदे, शिपाई- रमेश चव्हाण, भगवान सुतार, गौरख वंजारी, चंद्रकांत भोसले, डी.एम. यादव, बाळासाहेब टिळेकर, पोलीस पाटील- दिपक गिरी, रुबीना मुलाणी, कोतवाल अमोल गायकवाड, सचिन जंगम, तांत्रिक सहायक इक्बाल मुलाणी यांचा समावेश होता.