स्थैर्य, कऱ्हाड (जि. सातारा), दि.२० : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देणे गरजेचे आहे, ही निवडणूक विचारांची आहे आणि ही आपण जिंकणे महत्त्वाचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येथे कार्यकर्ता मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी युवा नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड यांचे पुतणे रणजित लाड, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांचे प्रतिनिधी श्री. वाळके, दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील, प्रा. धनाजी काटकर, कऱ्हाड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, राजेंद्र यादव, अशोकराव पाटील उपस्थित होते. आमदार चव्हाण म्हणाले, “”पुणे विभागाचे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, यासाठी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पदवीधर व शिक्षकच्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत. प्रत्येक निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे असते, तसेच या निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक मत मतपेटीत जाण्यासाठी मतदारांना अधिकाधिक जागृत करणे गरजेचे आहे.