चला सोलापूरकरांनो….वाहतूक साक्षर होऊया… पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची साद


स्थैर्य ,सोलापूर, दि .२८: अपघाताचे प्रमाण आपल्या देशात सर्वाधिक आहे. अपघातात मरण पावणाऱ्यांचे प्रमाण 18 ते 40 या वयोगटातील 70  टक्के आहे. वाहतूक आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. यामुळे सोलापूरकरांनो चला आता आपण वाहतूक साक्षर होऊया…वाहतुकीचे नियम पाळूया, हेल्मेट वापरुया, वेगमर्यादा पाळूया….आणि आपल्या वर्तनात बदल करूया, अशी साद सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूरकरांना घातली.

नियोजन भवन येथे सार्वजनिक बांधकाम, पोलीस, परिवहन विभाग, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 32 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2021 या कार्यक्रमात श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम, पोलीस उपायुक्त दिपाली घाटे-घाडगे आदी उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, अनेक वर्षांपासून आपण वाहतूक सुरक्षा, रस्ता सुरक्षा अभियान राबवत आहोत. देशात दरवर्षी रस्ते अपघातात मरण पावणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. यामध्ये मोठी संख्या तरुणांची आहे. वेगाची आवड सर्वांना असते. जीव वाचविण्यासाठी वेगावर नियंत्रण महत्वाचे आहे. आपला देश तरूणांचा आहे. जगातील कोणत्याही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय तरुण आहेत. आपला देश आयटी क्षेत्रात तरुणाईच्या जोरावर आघाडीवर आहे. आपल्या घरी आई,वडिल, बहिण, पत्नी वाट पहात असतात. त्यांच्यासह राज्य, देशासाठी आजच्या तरूणांची गरज आहे. प्रत्येकाने वेगावर नियंत्रण ठेवायला हवे,’.

अक्षर साक्षरता, आर्थिक साक्षरता, पर्यावरण साक्षरता अशा विविध मुद्यांवर आजपर्यंत चर्चा झाली आहे. याबाबत खूप संशोधन झाले आहे. यामुळे लोकांमध्ये खूप जागरुकता निर्माण झाली आहे. मात्र आता वेळ आहे ती वाहतूक साक्षरता यावर चर्चा करण्याची. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. रस्ता सुरक्षा अभियान जनतेचे झाल्यानंतरच यशस्वी होईल. सोलापूरकर नागरिकांनी रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.

यावेळी रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान, रस्ता सुरक्षा-जीवन रक्षा माहिती पुस्तिकेचे पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता विलास मोरे, संभाजी धोत्रे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. मोरे यांनी तर प्रास्ताविक श्री. शेलार यांनी केले.

कार्टुन रूपातील माहिती पुस्तिका जिल्ह्यातील शाळांमध्ये देऊन रस्ते सुरक्षा आणि अपघाताबाबत  प्रबोधन करण्यात येणार आहे. 


Back to top button
Don`t copy text!