सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या लालपरीला अधिक सक्षम करणार – परिवहनमंत्री अनिल परब


स्थैर्य, सिंधुदुर्गनगरी, दि.30 :- गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणारी. सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली, प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या लालपरी एसटी बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन, परिवहनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज केले.

कुडाळ येथील नूतन बसस्थानकाचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन महामंडळाच्या मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे ऑनलाईन जोडले गेले होते. प्रत्यक्ष उद्घाटन कार्यक्रमात आमदार वैभव नाईक, कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ओंकार तेली. गटविकास अधिकारी मोहन भोई, जि.प. सदस्य अमरसिंह सावंत, सिंधुदुर्ग एस.टी. विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, डेपो मॅनेजर सुजित डोंगरे, महेश सावंत, काका कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कुडाळ बसस्थानक 1971 पासून कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकापैकी एक असे हे बस स्थानक आहे. बरीच वर्षे या स्थानकामध्ये प्रवाशांसाठी अद्ययावत इमारत असावी, अशी जनतेची मागणी होती. आज ती मागणी पूर्ण करण्यात यश आले आहे. असे सांगून परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले, कुडाळच्या बसस्थानकातील उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. कोरोनाच्या महामारीमुळे कुडाळ स्थानकाचे उद्घाटन व लोकार्पण झाले नव्हते ते आज माझ्या हस्ते झाले. त्यामुळे प्रवाशांची अधिक चांगली सोय झाली यांचा मला आनंद आहे.

आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले, कुडाळ शहरामध्ये अद्ययावत बसस्थानक ही या शहराची गरज होती. सुमारे 1 कोटी 40 लाख रुपये खर्च करुन हे बस स्थानक उभारण्यात आले आहे. या नवीन बसस्थानकामुळे प्रवाशांची अत्यंत चांगली सोय झाली आहे. नवीन बसस्थानकामुळे कुडाळ शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. कुडाळ स्थानकासमोरील रस्ता करण्यासाठी 20 लाखांची तरतूद करण्यात आली असून हे कामही लवकरच पूर्ण होईल. त्याचबरोबर कुडाळ शहरातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूदही करण्यात येईल, असे ते शेवटी म्हणाले.

याप्रसंगी सिंधुदुर्ग एस.टी विभाग नियंत्रण प्रकाश रसाळ, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, अमित सावंत यांची समयोचित भाषणे झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. परिवहनमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले तर प्रत्यक्ष आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी कुडाळ शहरातील नगरसेवक, पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, एस.टी.महामंडळातील अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!