महाविकास आघाडीतील कुरबुरी पुन्हा चव्हाट्यावर ;काँग्रेसकडून आघाडीतील नेत्यांना इशारा


 

स्थैर्य, मुंबई, दि.५: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहेत. मात्र या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद असल्याचे पुन्हापुन्हा समोर येते. दरम्यान काँग्रेसला नेहमीच दुर्लक्षित केले जात असल्याच्या चर्चा होत असतात. आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष दुखावला गेल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्यामुळे महाआघाडीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. यावरुन काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीतल नेत्यांना इशाराच दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीविषयी आपली भूमिका मांडली होती. त्यावरूनच काँग्रेस आता नाराज आहे असे बोलले जात होते. यातच यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत नेत्यांना इशारा दिला आहे. ‘आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे.’ असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

काय म्हणाले होते शरद पवार


‘राहुल गांधी यांच्यात देश चालवण्यासाठी लागणारे सातत्य नाही,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केले होते. याशिवाय, पवारांनी अमेरिके माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकातून राहुल गांधींवर केलेल्या टीकेलाही अयोग्य म्हटले होते. ‘सध्या देश राहुल गांधींचे नेतृत्व स्विकारण्यास तयार आहे का ?’ या प्रश्नावर पवार म्हणाले होते की, ‘याबाबत अनेक तर्क-वितर्क आहेत. सध्या त्यांच्यात(राहुल गांधी) सातत्याची कमतरता आहे.’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!