
कोळकी येथील जमिनीचे बनावट मूल्यांकन प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सर्व संशयितांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑगस्ट : फलटण तालुक्यातील कोळकी येथील जमिनीचा भोगवटादार वर्ग बदलण्यासाठी बनावट मूल्यांकन दाखला देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांवर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवार, २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी दिली.
बनावट प्रमाणपत्राचा वापर
तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या आदेशानुसार निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रणधीर धनसिंगराव भोईटे, निखिल रामदास देवकर, प्रवीण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजित तुकाराम इंगळे, राजेंद्र सदाशिव कापसे, विक्रम महादेवराव झांजुर्णे आणि वीरेंद्र विक्रम झांजुर्णे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. कोळकी येथील गट क्रमांक ७९ आणि ८० मधील जमिनीचा भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यासाठी संशयितांनी बनावट मूल्यांकन दाखला सादर केला होता.
नेमका प्रकार काय?
संशयितांनी दुय्यम निबंधक कार्यालयाचा बनावट शिक्का असलेला मूल्यांकन दाखला तहसील कार्यालयात सादर केला. या खोट्या मूल्यांकनानुसार निर्धारित केलेली १७ लाख ५१ हजार रुपये ही रक्कम शासकीय खजिन्यात भरण्यात आली. त्यानंतर जमिनीचा वर्ग बदलण्याचा आदेशही पारित झाला. मात्र, प्रथमेश शिंदे आणि अनिकेत माने यांनी या प्रक्रियेतील बनावट दाखल्याबाबत लेखी तक्रार केली.
कारवाई आणि पोलीस कोठडी
तक्रारीनंतर खरी माहिती समोर आली. जमिनीचे मूळ मूल्यांकन ७६ लाख ५९ हजार रुपये होते व त्यानुसार ३८ लाख २९ हजार ५०० रुपये भरणे अपेक्षित होते. शासनाची फसवणूक उघड झाल्यानंतर संशयितांकडून उर्वरित २० लाख ८० हजार रुपये भरून घेण्यात आले. शासनाचे आर्थिक नुकसान टळले असले तरी, जाणीवपूर्वक बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्याखाली अनिकेत माने यांनी फौजदारी कारवाईची मागणी केली. यावरून तहसीलदार कार्यालयाच्या सूचनेनुसार आठही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
