डोळ्यांत चटणी टाकून मंगळसूत्र लुटणारा जेरबंद; तपासात आठ मोटारींच्या चोरीचा उलगडा

फलटण तालुक्यातील विडणी येथे महिलेच्या डोळ्यांत चटणी टाकून मंगळसूत्र लुटणाऱ्या संशयिताला फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून आठ मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २० ऑगस्ट : विडणी (ता. फलटण) हद्दीत एका महिलेच्या डोळ्यांत चटणी टाकून मंगळसूत्र लुटणाऱ्या संशयित आरोपीला फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या संशयिताकडे कसून चौकशी केली असता त्याने विडणी परिसरातून आठ कृषी पंपांच्या (मोटारींच्या) चोऱ्या केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चार लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्ह्याची उकल व मुद्देमाल जप्त

विडणी हद्दीतील २४ फाटा येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेल्याप्रकरणी संशयित अथर्व ऊर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने विडणी परिसरात तब्बल आठ ठिकाणी मोटारी चोरल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरीला गेलेले मंगळसूत्र आणि शेतकऱ्यांच्या मोटारी परत मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दहा दिवसांत १४ गुन्हे उघडकीस

गेल्या दहा दिवसांत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने विशेष मोहीम राबवून तब्बल १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये जबरी चोरी, चोरीचा प्रयत्न आणि मोटार चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, उपनिरीक्षक दीपक पवार तसेच नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन वावरे, विक्रम बनकर आणि हनुमंत दडस यांनी ही कारवाई केली.

Back to top button
Don`t copy text!