…तेव्हा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा, खडसेंच्या दाव्याची पोलखोल


 

स्थैर्य, मुंबई, दि.२३: एकाही राजकीय पक्षाने
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप यांनी माझ्या राजीनाम्याची आणि
चौकशीची मागणी केलेली नव्हती, विधानमंडळात कोणी आक्षेप घेतला असेल, चौकशी
करा असं म्हटलं असेल तर मी एका मिनिटात राजकारण सोडायला तयार आहे.
राजीनाम्याची मागणी केलेली नसताना माझा राजीनामा घेतला गेला असं विधान
खडसेंनी भाजपा सोडताना केलं होतं.

पुणे येथील भूखंड घोटाळा, दाऊद कनेक्शन,
पीए लाच प्रकरण अशा एकामागोमाग एक घोटाळ्यांच्या आरोपांनी एकनाथ
खडसेंविरोधात वातावरण तयार झालं, तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे
पाटील, धनंजय मुंडे यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. एकनाथ खडसे
यांच्यावर होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे दिसून येत असूनही
त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंचा
राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीनं केली होती.

विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी
तेव्हाचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांना भेटून एकनाथ खडसेंच्या
राजीनाम्याची मागणी केली होती. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही
नैतिकतेच्या आधारावर एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला पाहिजे, अशाप्रकारे मागणी
केली होती.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात
सत्तांतर झाले, तेव्हा भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार म्हणून
एकनाथ खडसेंचे नाव घेतले जात होते, मात्र प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस
यांना मुख्यमंत्री पद मिळाले आणि एकनाथ खडसेंच्या वाट्याला महसूल मंत्रीपद
आले. त्यावेळी झालेल्या आरोपांमुळे खडसे यांना मंत्रिपदाचा त्याग करावा
लागला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!