कंगनाचे महाराष्ट्र प्रेम:’मला महाराष्ट्र आवडतो’ कंगनाचे मराठीतून गोडवे; ट्विट करुन म्हणाली – मोठ्या बॅनरचे चित्रपट नाकारुन शिवाजी महाराज आणि लक्ष्मीबाईंवर चित्रपट बनवले


 

स्थैर्य, सातारा, दि.७: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते. मुंबई पोलिसांची भीती वाटते, असे वक्तव्य करुन तिने वादाला तोंडच फोडले. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. यानंतर सोशल मीडियावर कंगनावर जोरदार टीका झाली. कंगनाविषयी उफाळलेला मुंबईकरांचा जनक्षोभ अद्याप मावळलेला नसतानाच कंगनाने मराठीतून गोडवे गायले आहेत. ‘मला महाराष्ट्र आवडतो’, असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

”यश मिळाल्यानंतर मला मोठे हिरो असलेले, बिग बॅनर चित्रपट ऑफर करण्यात आले, पण मी सर्वांना नाकारले. मला प्रचंड विरोध सहन करावा लागला, मी मोठा स्ट्रगल केला. त्यानंतर मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी, कारण मला महाराष्ट्र आवडतो”, असे ट्विट कंगनाने केले आहे.

@BJP4Maha अशा एका ट्विटर हँडलवर कंगनाचे गुणगान गाणारे ट्विट करण्यात आले होते. ”साधारण दोन ते तीन वर्षांपूर्वी मणिकर्णिका या राणी लक्ष्मीबाईंवरील चित्रपटाच्या ट्रेलरचे उद्घाटन कंगनाने महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करुन केले होते. खरं तर बॉलिवूडसारख्या खाणावळीच्या अधिपत्याखाली असलेल्या क्षेत्रामध्ये हे धाडसच होते.” असे यात म्हटले होते, त्याला उत्तर देताना कंगनाने महाराष्ट्रावरचे आपले प्रेम व्यक्त केले.

काय आहे प्रकरण?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?, असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता.

त्यानंतर कंगनाने आणखी एक ट्विट करत, ‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’, असे प्रत्युत्तर दिले आहे.

यावर आता संजय राऊत म्हणाले की, “धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमावते, खाते, मुंबई पोलीस त्यांचे रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!