

साताऱ्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्या’चा समारोप पार पडला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जलसंपदा विभागाला पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले.
स्थैर्य, सातारा, दि. १ : पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन कमी पाण्यात जास्त पिके घेता येतात. हे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घ्यावा. तसेच, येत्या काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता धरणांमधील पाणीसाठ्याचे अत्यंत काटेकोरपणे व योग्य नियोजन करावे, असे सक्त निर्देश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पधंरवडा-२०२६’ चा समारोप पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती
या समारोप कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, अधीक्षक अभियंता अभय काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘१० जूनपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करा’
उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, यावर भर देत पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, धरणांमधील पाणी हे कॅनॉलद्वारे आणि पाटांमधून शेतकऱ्यांच्या शिवारात जाते. या प्रवासात पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. याबरोबरच धरणांमधील गळती काढण्याच्या कामाला जलसंपदा विभागाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
“हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा १० जूनपर्यंत पुरेल, याप्रमाणे पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे. जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व लोकोपयोगी उपक्रमांना पालकमंत्री म्हणून माझे कायम सहकार्य राहील.”
– शंभूराज देसाई (पालकमंत्री, सातारा)
‘अहिल्यादेवींचे विचार आचरणात आणावेत’
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या की, अहिल्यादेवींनी स्त्री-पुरुष समानता, जलव्यवस्थापन आणि मंदिर निर्मितीसाठी केलेले कार्य खऱ्या अर्थाने अजरामर आहे. अनेक संकटांचा सामना करूनही त्यांनी लोककल्याण जोपासले. त्यांचे हे आदर्श चरित्र आचरणात आणल्यास समाजात एक सुंदर व्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या समारोप कार्यक्रमास जलसंपदा विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
