होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांना राज्य शासनाकडून न्याय


स्थैर्य, दि.११: होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्या महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या प्रयत्नाने मार्गी लागल्या. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच परिषदेच्या माजी अध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. रजनीताई इंदूलकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याची माहिती परिषदेचे सदस्य डॉ. सुनील मुळीक यांनी कराड येथे बोलताना दिली.
डॉ. मुळीक म्हणाले, की सीसीएमपी अभ्यासक्रम उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी व त्यांचे अ‍ॅलोपॅथीक प्रॅक्टिस करण्याबाबतचे अधिकार, उपसंचालक होमिओपॅथी, शासकीय होमिओपॅथिक रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिषदेत नियमित प्रबंधकांची नियुक्ती, उपसंचालकांना प्रशासकीय निर्णयांचे अधिकार मिळणे, प्रत्येक महसूली विभागात किमान एकतरी शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाची स्थापना, परिषदेच्या प्रस्तावित नियम, उपनियमांना मंजूरी अशा मागण्यांचे निवेदन घेऊन परिषदेचे अध्यक्ष डॉ. नितीन गावडे, सदस्य डॉ. सुनील मुळीक, परिषदेच्या माजी अध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. रजनीताई इंदुलकर, परिषदेचे माजी प्रशासक बाहुबली शहा यांनी मुंबइमध्ये शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पवार यांनी या शिष्टमंडळाकडून मुद्देसूद माहिती जाणून घेऊन संबंधित मंत्र्यांना होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विचारणा केली असता, प्रभावीपणे पाठपुराव्या अभावी हे प्रश्न प्रलंबित राहिल्याचे पवारांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी होमिओपॅथी परिषदेच्या शिष्टमंडळासमवेत तत्काळ बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सत्वर मार्गी लावण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना केल्या. त्यानुसार लगेचच मंत्री देशमुख यांनी प्रशासन व परिषदेच्या शिष्टमंडळासमवेत बैठक घेवून चर्चेअंती होमिओपॅथी डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य विभागासमवेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी होमिओपॅथी डॉक्टरांच्या मागण्या व समस्यांबाबत सकारात्मकता दर्शवली. तब्बल तीन तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत अतितप्तर १०८ रूग्णवाहिकेवर होमिओपॅथी डॉक्टरांची नियुक्ती, राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत होमिओपॅथी वैद्यकीय अधिकाºयांच्या पदसंख्येत वाढ करणे, एनएचएममधील चिकित्सा पद्धतीच्या वैद्यकीय अधिकाºयांच्या वेतनातील तपावत दूर करणे, ‘सीएचओ’पदावर नियुक्ती करता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे अशा सूचना या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या अशी माहिती डॉ. सुनील मुळीक यांनी दिली. दरम्यान, होमिओपॅथी डॉक्टरांच्या महत्वपूर्ण मागण्या मान्य झाल्याबद्दल होमिओपॅथी परिषदेचे अध्यक्ष डॉ. नितीन गावडे, डॉ. सुनील मुळीक तसेच परिषदेच्या शिष्टमंडळाप्रती होमिओपॅथी डॉक्टरांकडून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!