जिंती, फडतरवाडी व खामगावमध्ये जनावरांना लम्पीची लागण झाल्याने साथ रोग अधिनियमाद्वारे बाधित क्षेत्र म्हणून घोषित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०९ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील जिंती, फडतरवाडी व खामगाव येथील एकूण अकरा पाळीव जनावरांना लम्पी त्वचा रोगाची लागण झाल्याने सदर गावांच्या दहा किलोमिटर त्रिजेच्या परिसरातील सर्व गावे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी साथ रोग अधिनियमाद्वारे बाधित क्षेत्र म्हणून घोषित केली आली आहेत.

दरम्यान फलटण तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात असून पशु पालकांनी घाबरुन न जाता योग्य दक्षता घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

फलटण तालुक्यातील जिंती येथील पाच, फडतरवाडीतील तिन व खामगाव येथील तिन पाळीव जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने संबंधित जनावरांचे रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्यांचे अहवाल लम्पी बाधित आले होते. यानंतर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने बाधित जनावरांवर तात्काळ औषधोपचार करण्यात आले. तसेच लम्पीचा संसर्ग तालुक्यात अन्यत्र फैलावू नये यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने गुरांचा गोठा व आजूबाजूच्या परिसरात किटनाशकाची फवारणी करावी असे आवाहण करण्यात आले. लम्पी रोग हा संसर्गजन्य असून त्याचा फैलाव एका जनावरापासुन अन्य जनावरास होतो. परंतू बाधित जनावरे औषधोपचारांना चांगला प्रतिसाद देत असुन त्यांच्यामध्ये लक्षणीय सुधारणा आढळून आल्याचे व परीस्थिती नियंत्रणात असल्याचे पंचायत समितीचे पशुसंवर्धन विकास अधिकारी ( विस्तार ) डॉ. नंदकुमार फाळके यांनी सांगत पशुपालकांनी घाबरुन न जाता आपल्या किंवा परिसरातील जनावरांमध्ये लम्पी दृष्य लक्षणे आढळली तर तात्काळ नजिकच्या पशू वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे व आजारी जनावरे अन्य जनावरांपासून वेगळी बांधावीत, गोठ्यात व परिसरात त्वरीत किट नाशकाची फवारणी करावी आणि नविन खरेदी केलेली जनावरे नेहमीच्या जनावरांपासुन २८ दिवस वेगळी बांधावीत असे आवाहन केले आहे. लम्पी रोगामुळे घोषीत केलेल्या बाधीत क्षेत्रामध्ये मोठ्या जनावरांची खरेदी, विक्री व वाहतूक करता येणार नाही, तसेच बाजार, जत्रा व प्रदर्शन, बैलाच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील आदेश येईपर्यंत पुर्णपणे प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

लम्पी बाधीत जनावरांवर योग्य तो औषधोपचार करण्यात आला आहे. जिंती, फडतरवाडी व खामगाव परिसरातील चार हजार ७७५ गाय, म्हैस व बैल या जनावरांना लम्पी स्कीन डिसीसचे लसीकरण करण्यात आले आहे. काही काळ नविन जनावरे खरेदी टाळावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. व्ही. टी. पवार यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!