रहिमतपुरनगरीत लवकरच जमनाबाईंचे स्मारक

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची आठ दिवसांत पाठपुरावा करण्याची ग्वाही

स्थैर्य, सातारा, दि. 23 सप्टेंबर : रहिमतपूरची माती ही प्रत्येकाला अभिमान वाटावी, अशी आहे. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत येथील माहेरवाशीण मातेने महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास निर्माण केला. हा इतिहास स्वतंत्र भारत देशाला प्रेरणा देणारा आहे. त्या महाराणी जमनाबाई गायकवाड यांच्या कर्तृत्वाचा सन्मान झाला पाहिजे. हा इतिहास पुढील पिढीला कळला पाहिजे, यासाठी रहिमतपूरनगरीत जमनाबाईंचे यांचे स्मारक लवकरच उभे राहील, यासाठी मी आठ दिवसांत पाठपुरावा करेन, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम, ’दोन तास समाजासाठी महिला ग्रुप’ यांच्या वतीने येथील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या महिला कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, चित्रलेखा माने कदम, पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अमरसिंह जाधवराव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, प्रियांका कदम आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री आशिष शेलार म्हणाले, नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासासाठी सातत्याने कार्यरत राहणारे नेतृत्व आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी महिलांना सक्षम केले आहे. महिलांना विविध अधिकार दिले आहेत. विरोधक ’लाडकी बहीण योजना’ बंद पडणार, असा अपप्रचार करीत आहेत; पण मी वचन देतो, ही योजना बंद पडणार नाही, तर उलट यामध्ये अधिक वाढ होईल. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. यावेळी आमदार डॉ. भोसले, आमदार घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. चित्रलेखा माने कदम यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमासाठी सुनिशा शहा, दैवशीला मोहिते, अश्विनी हुबळीकर, निशा जाधव, वैष्णवी कदम, वैशाली टंकसाळे, वैशाली मांढरे, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, विविध संस्थांचे पदाधिकारी, तेजस्विनी महिला मंडळाच्या पदाधिकारी व परिसरातील महिला उपस्थित होत्या.

चित्रलेखा माने- कदम, ’दोन तास समाजासाठी’ ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. महिलांचे उत्तम संघटन त्यांनी केले आहे. हा अनोखा ग्रुप महिलाशक्तीला बळकटी देणारा आहे. यावेळी हजारो महिलांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आशिष शेलार यांना राखी बांधली. त्यावेळी भावुक होत शेलार म्हणाले, इतक्या संख्येने हजारो बहिणींनी सार्वजनिकरीत्या राखी बांधून आपलेसे केले आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रहिमतपूरच्या भगिनींची सेवा करीत राहीन.

Back to top button
Don`t copy text!