जाधव कुटुंबियांची गरीब विद्यार्थ्यांना लाखमोलाची मदत; शालेय साहित्याचे वाटप


दैनिक स्थैर्य | दि. २८ जून २०२४ | फलटण |
महात्मा एज्युकेशन सोसायटी फलटणच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी कॉम्प्युटर इंजिनिअर सुमित हनुमंत जाधव याने इ. ५ वी ते १० वीतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य किटचे वितरण करून आपली शाळेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे. जाधव याचे मदतीचे हे दुसरे वर्ष आहे.

यावेळी संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीच्या अध्यक्षा अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, मुख्याध्यापक मनीष निंबाळकर (प्रथामिक), भिवा जगताप (माध्यमिक), सुरेखा सोनवले, सुमित जाधव यांची आई सौ.जयश्री, पत्नी सौ. मोहिनी आणि मुलगा चि. वीरधवल उपस्थित होते.

सुमित जाधव यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. दहावी, बारावीपर्यंतचे शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. इंजिनिअरिंगचे पदवी शिक्षण कसे पूर्ण होणार, या विवंचनेत तो असताना श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी एज्युकेशन लोन करून देण्यात त्याला मोलाची मदत केली. त्यामुळे मी आज यशस्वी होऊ शकलो. आपणही आपल्या गुरुंचा आदर्श घेऊन गरजू, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन ही साखळी पुढे नेण्याचा निश्चय केला. तेव्हापासून गरजवंतांच्या शिक्षणात बाधा येऊ नये म्हणून गेली दोन वर्षे गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जाधव याने सांगितले.

आपण कितीही श्रीमंत झालो तरीही मागे वळून पाहताना आपल्या शाळा माऊलीसाठी जे काही लागेल ते देण्याचे औदार्य सुमितने दाखवले, ही बाब निश्चित प्रेरणादायी असल्याचे रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले.

सौ. बेडकिहाळ यांनी जाधव कुटुंबीयांचे यथोचित सन्मान केला. मनीष निंबाळकर यांनी मान्यवर आणि जाधव कुटुंबीय यांचे स्वागत केले. हेमलता गुंजवटे यांनी आभार मानले.

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना सुमित जाधव, रविंद्र बेडकिहाळ, गजानन पारखे, अलका बेडकिहाळ मनीष निंबाळकर, भिवा जगताप आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!