शेतकऱ्यांच्या दिवाळीची वाढली गोडी; सोयाबीनला आला सोन्याचा भाव


 

स्थैर्य, सातारा, दि.१२ : अतिवृष्टी झाली, अनेक पिके शेतात कुजली; पण या संकटांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनने मात्र, दिलासा दिला आहे. कधी नव्हे ते सोयाबीनला बाजारपेठेत 4200 रुपयांपर्यंत दर मिळू लागला आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी तरी गोड होणार आहे.

प्रत्येक वर्षी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळतो. व्यापारी तर सोयाबीनची आर्द्रता तपासून त्यानुसार दर देतात. या वेळी पोत्यामागे दोन ते दहा किलोपर्यंत वजावटही केली जाते. अशावेळी सोयाबीनला 25 ते 32 रुपयांपर्यंतच दर मिळतो; पण यावर्षी सोयाबीन काढणीच्या तोंडावरच झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी सोयाबीनचे नुकसान झाले; पण पावसापूर्वी काढणी झालेल्या सोयाबीनला सध्या आता चांगला दर मिळू लागला आहे, तर ज्यांची उशिरा काढणी झाली त्यांचे सोयाबीन चांगल्या प्रतीचे आहे. त्यामुळे खरिपाच्या सुगीत सोयाबीनने शेतकऱ्यांना आधार दिला आहे.

सोयाबीनला शासनाने 3880 रुपये हमीभाव दिला आहे; पण सुरवातीला हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन घातले गेले. कोरोनामुळे यावर्षी शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसला आहे; पण भाजीपाला पिकाने शेतकऱ्यांना कोरोनात आधार दिला होता. आता सोयाबीनला चांगला दर आला असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. सध्या बाजारपेठेत क्विंटलला 4180 ते 4200 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. त्यामुळे ज्यांनी दर वाढेल या अपेक्षेने सोयाबीन काढणी करून घरीच ठेवले होते. त्यांनी आता दर वाढल्याने सोयाबीनची विक्री सुरू केली आहे. अद्यापही काही शेतकऱ्यांना सोयाबीनच दर वाढण्याची शक्‍यता वाटत असल्याने त्यांनी आणखी वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनला गेल्या काही वर्षात इतक्‍या मोठ्या प्रमाणात दर कधीच आला नव्हता. एरव्ही शासनाच्या हमीभावापर्यंत पण बाजारातील दर पोचत नाही; पण यावर्षी कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दराने चांगला हातभार दिल्याचे चित्र आहे. सध्या शेतकरी स्थानिक बाजारात सोयाबीन घालत आहे. त्यांना 4100 ते 4200 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हा दर वाढण्याची शक्‍यता असल्याचेही सांगितले जात आहे; पण दर कमी होण्याचा धोका लक्षात घेऊन शेतकरी आहे या सोयाबीनचे पैसे करून घेत असल्याचे दिसत आहे. 

बियाण्यासाठी दर वाढण्याची शक्‍यता 

कृषी विभागाच्या सूचनेनुसार घरचे सोयाबीन बियाण्यासाठी ठेवण्याकडेही शेतकऱ्यांचा कल असतो. खरीप पेरणीच्या काळात बियाण्यासाठी ठेवलेल्या सोयाबीनला 50 रुपयांपर्यंत दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा मशागतीसह पेरणीसाठी पैसे मिळू शकतात. काही निवडक शेतकरीच सोयाबीनचे घरगुती बियाणे ठेवतात; पण यावर्षी सोयाबीनचे दर आताच चार हजार रुपयांवर असल्याने बियाण्यासाठी हा दर वाढण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!