दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । सातारा । गोडोली तळे परिसरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचा पुतळा बसवण्याच्या शाहूनगरी फाउंडेशनच्या मागणीला सातारा पालिकेने हिरवा कंदील दिला आहे. हा विषय धोरणात्मक असल्याने जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेसाठी सुद्धा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती शाहूनगरी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष वृषाली राजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
ऐतिहासिक शहर असलेल्या साताऱ्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. परंतु, स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा तसेच स्मारक अद्याप कुठेही नाही, हे क्लेशदायक आहे. स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या छत्रपतींचे स्मारक साताऱ्यात व्हावे, ही शिवभक्तांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्याबाबत धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शाहूनगरी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष वृषाली राजे भोसले यांनी गोडोली तळ्याच्या परिसरात शहराच्या पूर्व प्रवेशद्वारा जवळ छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अथवा स्मारक करण्यात यावे, असे निवेदन सातारा पालिकेला सादर केले होते. याबाबत योग्य मार्गदर्शक व्यक्तींचा सल्ला घेऊन प्रशासकीय कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती.
सातारा पालिकेने मागणीची दखल घेऊन पुतळा बसवण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेणे आवश्यक असल्याने जिल्हास्तरीय समितीकडे तो प्रस्ताव पाठवला आहे आणि पालिका पातळीवर या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचे सातारा पालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक अभिजीत बापट यांनी सांगितले पालिकेने मंजुरी दिल्याबद्दल वृषाली राजे पवार यांनी सातारा जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.