साहित्यिकांनी राजसंस्थेला प्रश्न विचारणे गरजेचे : नितीन बानगुडे – पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 25 नोव्हेंबर 2023 | फलटण | आताच्या साहित्यिकांच्या विचार स्पष्टता असणे गरजेचे आहे. साहित्यिक जे साहित्य निर्मिती करतात त्याला लोकमान्यता की राजमान्यता मिळणे गरजेचे हे साहित्यिकांनी स्वतः ठरवणे गरजेचे आहे. आताच्या राजसंस्थेमुळे विविध प्रश्न उपस्थित राहिले आहेत. आताच्या काळामध्ये साहित्यिकांनी राजसंस्थेला प्रश्न विचारणे गरजेचे आहे; असे मत नितीन बानगुडे – पाटील यांनी व्यक्त केले.

फलटण येथे महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखा, श्री सद्गुरू प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे – पाटील अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को – ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे, सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे संचालक रवींद्र बेडकिहाळ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त तथा दैनिक पुण्यनगरी, साताराचे संपादक विनोद कुलकर्णी, जेष्ठ साहित्यिक राजेंद्र माने, एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे, साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके, स्वयंसिद्धा उद्योग समूहाच्या शिल्पकार सौ. मधुबाला भोसले, महाराजा मल्टिस्टेटचे उपाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पष्ट विचार, निर्भीड विचार ही आताच्या काळजी गरज आहे. साहित्यिक आणि राजकारणी हातात हात घालून काम करतात. साहित्यिक व राजकारणी यांच्यातून लोकहिताचे काम झाली पाहिजेत. व्हाट्सअप्पच्या ज्ञानातून बाहेर पडून पुस्तकातून ज्ञान येणे गरजेचे आहे. आता आगामी काळामध्ये म्हणजेच येत्या 5 वर्षात आपल्या भारताच्या प्रत्येक शहरात मोबाईल डिटोक्स सेंटर उभे राहतील किंवा असणे गरजेचे आहे; म्हणजे आता जे मोबाईलचा वैताग यायला लागला आहे; त्यापासून दूर होण्यासाठी मोबाईल डिटोक्स सेंटरचा उपयोग होईल; त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे मोबाईल चालणार नाहीत; असे ही मत नितीन बानगुडे – पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

यावेळी बोलताना नितीन बानगुडे – पाटील म्हणाले की; येणाऱ्या काळामध्ये आता तो दिवस लांब राहिला नाही की, डॉक्टर गोळ्यासोबत पुस्तक वाचा असे लिहून देतील. आता बऱ्याच ठिकाणी बघितले जाते आई – वडील माझ्या मुलाला मराठी येत नाही असं जर अभिमानाने सांगत असतात खरं तर ही फार मोठी शोकांतिका आहे. पुस्तक लोकांच्या पर्यंत पोहचली पाहिजेत. पुस्तक तुमचं उद्याची पिढी घडवतात. पुस्तक मस्तक तयार करतात. पुढची यशवंत पिढी घडवायची असेल तर पुस्तकाच्या वाटेवर तरुण पिढी आणणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणावर आहेत. सहकार हा आपल्या सर्वांच्या घराघरात पोहचला आहे. जर सहकार चळवळ आपल्या येथे नसती तर फार वेगळे चित्र आपल्याला बघायला मिळाले असते. सहकार चळवळीमुळे हजारो नव्हे तर लाखो हातांना काम मिळाले आहे. आज सहकारी कारखाने आता वेगळ्या दिशेने जात आहे का ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. सहकारी संस्था व्यवस्थित चालत नाहीत परंतु तीच संस्था खाजगी झाल्यावर उत्तम चालते इथे कुठे यारी आपल्याला विचार करावे लागणार आहे. आपण सर्वांनी अर्थ साक्षर होणे गरजेचे आहे; असे मत सुरेश वाबळे यांनी व्यक्त केले.

तुमच्या गावापासून जवळपास 500 किलोमीटर वर एकादे विधायक काम होत असते आणि त्याची नोंद घेवून आम्हाला बोलवून आमच्या सर्वांचा सत्कार करण्यात आला हेच मोठी गोष्ट आहे. आमच्या पुस्तकाच्या बगीचा बघायला कोणीही आला तरी आम्ही त्याला त्याच्या क्षेत्रानुसार आम्ही त्याला पुस्तक भेट देतो. पुस्तक बगीचा उभारताना आम्हाला आमच्या गावातील जी पोर मोबाईलमध्ये डोकं घालून बसली होती ती आता पुस्तकात डोकं घालून बसली आहे. आता लहान मुले तिथे येत आहेत; ती पुस्तकं वाचत नाहीत आता फक्त चाळत आहेत आगामी काळात जेंव्हा त्यांनी एक जरी पुस्तक वाचलं तरी आमचा उपक्रम यशस्वी झाला; असे म्हणणे वावगे ठरणार नाही; असे मत एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा ही रवींद्र बेडकिहाळ यांच्यामुळे स्थापन झाली आहे. जर त्यावेळी त्यांनी परवानगी दिली नसती तर नक्कीच आज सातारा मधील साहित्य चळवळ बघायला मिळाली नसती. सातारा जिल्ह्यामध्ये साहित्य चळवळ टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी रवींद्र बेडकिहाळ यांचेच मोठे योगदान आहे. आता नुकत्याच झालेल्या पतसंस्था फेडरेशनच्या निवडणुकीत जेवढे योगदान श्रीमंत रामराजे यांचे आहे तेवढेच योगदान हे रवींद्र बेडकिहाळ यांचे आहे; असे मत विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

आजपर्यंत राज्यात व देशामध्ये आम्ही सर्वांनीच अनेक संमेलने बघितली आहेत. त्यामध्ये विविध संमेलने आयोजित करण्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. परंतु या संमेलनाचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे शिवशंभू व यशवंत विचार यांचे व्याख्यान; ते ऐकण्यासाठीच आपण सर्व जण आतुर आहोत. एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नवाळे यांनी संपूर्ण देशामध्ये पहिला असा पुस्तक बगीचा उभारला आहे; ते बघण्यासाठी प्रत्येक साहित्यिकांनी अवश्य बघितले पाहिजे. फलटण तालुक्याला साहित्याची एक आगळी वेगळी परंपरा आहे. फलटणचे अधिपती स्व. श्रीमंत मालोजीराजे यांनी साहित्य व संस्कृतीला नेहमीच प्रोत्साहन दिले आहेत; असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे संचालक रवींद्र बेडकिहाळ यांनी यावेळी व्यक्त केले.

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे नेते आज संपूर्ण देशामध्ये बघायला सुद्धा मिळत नाही; ही मोठी खंत आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने आज गेली 11 वर्षे फलटणमध्ये साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कोरोना कालावधी जर सोडला तर हे साहित्य संमेलन बंद नाही; असे मत सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले यांनी व्यक्त केले.

स्व. यशवंतराव चव्हाण साहेब हे जर राजकारणात आले नसते तर ते उत्कृष्ट साहित्यिक असते. महाराष्ट्र एक चांगल्या साहित्यिकाला मुकला; असे मत राज्यातील अनेक जेष्ठ व श्रेष्ठ मंडळीनी व्यक्त केले आहे; असे मत साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.

स्व. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को – ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त तथा दैनिक पुण्यनगरी, साताराचे संपादक विनोद कुलकर्णी, एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांची ओळख माजी प्राचार्य रवींद्र येवले यांनी करून दिली.

महाराष्ट्र साहित्य परिषदचे प्रमुख कार्यावाह प्रकाश पायगुडे व सुभाष बेडके यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जेष्ठ व्यक्ते श्रीधर साळुंखे, श्रीराम बझारचे संचालक बापूराव गावडे, जयकुमार शिंदे, महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे महादेव गुंजवटे, महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे कार्यवाह ताराचंद आवळे, प्रसिद्ध व्याख्याते रवींद्र कोकरे, महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे कार्यवाह अमर शेंडे, महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे कोषाध्यक्ष सौ. अलका बेडकिहाळ यांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!