गेल्या 30 वर्षात तालुक्यात कुणाची दादागिरी? : अशोकराव जाधव; रणजितसिंहांचे नाव खराब करण्याचा कट


दैनिक स्थैर्य | दि. 07 जुलै 2024 | फलटण | गेेल्या 30 वर्षांमध्ये फलटण तालुक्यात ज्यांची सत्ता आहे त्यांनी किती व कशी दादागिरी केली आहे हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे. निष्पाप विरोधी कार्यकर्त्यांना कोणतेही कारण नसताना गुन्ह्यांमध्ये गोवण्याचे काम गेल्या 30 वर्षात राजे गटाच्या माध्यमातून केले गेले आहे. गेली 30 वर्षे नगरपरिषदेमध्ये त्यांची सत्ता असतानासुद्धा नगरपरिषदेत कायम दादागिरीच यांनी केली आहे. विरोधकांची कामे मुद्दामून रखडवण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले आहे. आत्ताच्या लोकसभा निवडणूकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण तालुक्यातून जे मताधिक्य मिळाले त्यामुळे राजेगटाच्या पोटात गोळा आला असून रणजितसिंह यांचे नाव खराब करण्याचा कट मुद्दामून केला जात असल्याची टिका माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केली.

मलटण येथील वारकरी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अशोकराव जाधव बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अनुप शहा, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, अ‍ॅड.संदीप कांबळे, सुधीर अहिवळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

विकासकामांमध्ये तुलना करु शकत नसल्याने नाव बदनाम करण्याचे कटकारस्थान

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कधीही गुन्हेगारांना थारा दिलेला नाही. फलटण तालुक्यात गुन्हेगारांना आश्रय कोण देतं हे तालुक्यातील जनतेला ज्ञात आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे यांच्यासमोर त्यांच्याच बंगल्यामध्ये एका इच्छुक उमेदवारावर चाकू उगारण्यात आला तेव्हा श्रीमंत रामराजे हे मूग गिळून गप्प बसले होते. अशामध्ये आता माजी खासदार रणजितसिंह यांना जे फलटण तालुक्यात मताधिक्य मिळाले आहे त्याचा धसका घेत त्यांची विकासकामांमध्ये तुलना करु शकत नसल्याने त्यांचे नाव बदनाम करण्याचे कटकारस्थान राजे गटाकडून केले जात असल्याचे आरोप अनुप शहा यांनी केला.

गुन्हेगाराला वाचवण्याचा राजे गटाचा प्रयत्न

गत काही वर्षांपूर्वी फलटण बाजारसमिती येथे मी माझा शेतमाल विक्री करण्यासाठी गेलो होतो परंतु तेथे मुद्दामहून माझा शेतमाल घेण्यात आला नाही व व्यापार्‍यांनासुद्धा घेऊ दिला नाही. म्हणून मी माझा शेतमाल बाजार समितीच्या आवाराबाहेर येवून मोफत वाटला. त्यावेळेला बाजार समितीचे सचिव सोनवलकर यांनी येवून दादागिरी केली व माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुन्ह्यामध्ये काही सिद्ध होत नाही हे कळल्यानंतर गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांची तातडीने बदली करण्यात आली. सुप्रिम कोर्टाच्या निकालानुसार पोलीस स्टेशनला कोणीही गुन्हा नाोंद करण्यासाठी गेले तर त्यांचा गुन्हा नोद करुन घेणे पोलीसांना अनिवार्य आहे. गुन्हा खरा की खोटा हे ठरविण्याचे काम मा.न्यायालयाचे आहे. त्यामुळे मुद्दामून कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुन्हेगाराच्या बाजूला उभे राहून त्याला वाचवण्याचे काम काही जण करीत आहेत व आमचे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आम्हाला स्पष्ट सूचना आहेत की, राजकारणाच्या वेळी राजकारण आणि इतर वेळी फक्त समाजकारण. त्यामुळे आम्ही संयमाने वागत आहोत याचीसुद्धा नोंद घ्यावी, असे मत यावेळी अ‍ॅड.संदीप कांबळे यांनी व्यक्त केले.

राजे गटाकडून पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न

दोन दिवसांपूर्वी फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे यांनी जो माझ्यावर आरोप केला आहे तो अत्यंत चुकीचा असून ते यानिमित्ताने पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्याचे काम करीत आहेत. माझ्या प्रभागामधील दोन गटांतील मुलांमध्ये जबर भांडणे झाली आहेत. यामध्ये दोन्ही बाजूच्या मुलांना जबरदस्त लागले आहे. त्यांच्या भांडणामध्ये जाकीर कुरेशी यांचे नाव मुद्दामून गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता म्हणून मी पोलीस उपअधिक्षक राहूल धस यांच्या कार्यालयामध्ये जावून त्यांना याबाबतची सत्य परिस्थिती अवगत केली, अशी भूमिका सचिन अहिवळे यांनी यावेळी स्पष्ट केली.

एखाद्या गल्लीतील भांडणाचे राजकीय भांडवल कसे करावे हे राजे गटाकडून शिकणे गरजेेचे आहे. आत्ता त्यांच्या पाठीशी राजे गट उभा राहिला आहे त्यांचेच वडील कानिफनाथ घोलप यांच्या खूनाच्या वेळेस त्यांच्या मारेकर्‍यांच्या बाजूने कोण उभे राहिले होते हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. पोलीस उपअधिक्षक राहूल धस यांनी फलटण तालुक्यामध्ये लोकशाही जिवंत ठेवली आहे. गुन्हेगारांच्या बाजूने राहूल धस कधीही उभे राहत नाहीत. त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी मुद्दामून स्टंट केले जात आहेत. पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता कामकाज करावे, असे आवाहनही सचिन अहिवळे यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!