
दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । फलटण । आगामी काळात होऊ घातलेल्या सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समिती निवडणुकीचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार फलटण तालुक्यामधून दोन जिल्हा परिषद गटांची वाढ झाली असून पंचायत समितीच्या ४ गणांची वाढ झाली आहे. यापूर्वी फलटण तालुक्यात ७ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे १४ गण होते. आगामी काळात मात्र ९ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती चे १८ गण झाले आहेत.
सध्या इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटत असून आपल्या उमेदवारीबद्दल चाचपणी करताना दिसत आहेत. काही इच्छुक उमेदवार आपल्या गण आणि गटात समाविष्ट असलेल्या गावातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन प्रमुख दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे आपल्या नावाची शिफारस करण्याची विनवणी करत आहेत.
नव्या फेरबदलानुसार दुधेबावी गटातील सासकल, भाडळी बुद्रुक, भाडळी खुर्द, तिरकवाडी, वडले या छोट्या गावांमधील मतदार संख्या विचारात घेता कायमच जास्त मतदार असलेल्या दुधेबावी सारख्या मोठ्या गावांमधून व पूर्वीच्या कोळकी मधून सोनवलकर, नाळे, शिंदे या दोनच गावातील विशेषतः सोनवलकर व नाळे यानाच प्रतिनिधित्व दिले जात असून त्यांचे या छोट्या गावांच्या विधायक विकास कामांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे छोट्या गावांनी कंबर कसली असून येत्या काळात आरक्षण कोणते पडते यावर विचार मंथन करून या छोट्या गावांमधून उमेदवार देण्याच्या हालचालींना वेग आला आहे.पूर्वीच्या कोळकी गटात व दुधेबावी गणात कायमच सोनवलकर व नाळे यांचे वर्चस्व राहिले आहे.आता दुधेबावीमधील सोनवलकर व नाळे यांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा विचार छोट्या गावातील नागरिकांनी केला आहे. वास्तविक पाहता भाडळी खुर्द, तिरकवाडी, वडले याही गावांमध्ये धनगर व माळी समाजाचे लोक असून त्यांना मात्र बेरजेच्या गणितामुळे कायमच डावलले जाते. त्यामुळे दुधेबावी मधील नाळे व सोनवलकर यांनी कायमच सत्तेची फळे चाखली असून कायमच सत्ता आपल्याकडे राहावी असं वाटत आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये पडणारे राजकीय आरक्षण विचारात घेऊन छोटी गावे प्रस्थापित गावांना आव्हान देणार आहेत. दोन्ही पक्षांनी जर या छोट्या गावांचा निवडणुकीसाठी विचार केला नाही तर छोटी गावे तिसरा पर्याय उपलब्ध करून देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुधेबावी मधील दोन्ही पक्षातील प्रमुख उमेदवारांना चांगले आव्हान उभे करण्याचा मानस छोट्या गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.