
स्थैर्य, खटाव , दि.१५: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबरपर्यंत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जनतेच्या सहभागातून ही मोहीम सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमार्फत प्रभावीपणे राबविण्यात यावी, याविषयीचे आदेश आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी जारी केले आहेत.या पार्श्वभूमीवर खटाव तालुका पंचायत समिती मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सभापती रेखा घार्गे यांनी तालुक्यात “माझे कुटुंब,माझी जबाबदारी”या मोहिमेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले असल्याचे सांगितले.यावेळी गटविकास अधिकारी रमेश काळे,सहायक गटविकास अधिकारी मेडेवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ शेख,डॉ.संतोष मोरे आदींची उपस्थिती होती.
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याला अटकाव घालण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत शहर, गाव, पाडे, वस्त्या, तांडे येथील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी, कोमॉर्बिड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकाला व्यक्तिश: भेटून पथकाद्वारे आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
राज्यामध्ये गृहभेटीद्वारे संशयीत कोवीड तपासणी व उपचार.अति जोखीमचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोवीड-19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण. सारी, आयएलआय रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोवडी तपासणी आणि उपचार. गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरिकांचे कोवीड बाबत आरोग्य शिक्षण हे मोहिमेचे उद्दिष्ट असून
पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी किंवा आशा आणि २ स्वयंसेवक (१ पुरुष व १स्त्री) अशा स्वरूपाचे तपासणी पथक यामध्ये स्वयंसेवक स्थानीक सरपंच, नगरसेवक यांनी निश्चित करावयाचे आहेत. पथकातील सदस्यांना कोरोना दूत असे संबोधण्यात यावे. सरपंच, नगरसेवक यांच्याकडून स्वयंसेवक प्राप्त न झाल्यास त्या ऐवजी 1 आरोग्य कर्मचारी, आशा देण्यात यावी. अशा वेळी पथकात 2 आरोग्य कर्मचारी, आशा असतील.
पथकातील सदस्यांना पुढीलप्रमाणे साहित्य सर्वेक्षण वेळी पुरविण्यात येणार : इन्फ्रारेड थर्मामिटर, पल्स ऑक्सीमीटर, स्टिकर, मार्कर पेन, टी शर्ट, कॅप, बॅड, बॅच उपलब्धतेनुसार. नोंदणीसाठी ॲप डाऊनलोड, अर्ज, तीन लेअर मास्क व सॅनिटायझर.
मोहिम काळात पथकाने घ्यावयाची काळजी : पथक सदस्याला सर्वेक्षण करताना घरच्या व्यक्तींकडून सर्वेक्षण पथक सदस्यांची आणि सदस्यांचे घरातील व्यक्तींना संसर्ग होऊ नये यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात. सर्वेक्षण मोहिमे दरम्यान सतत मास्क परिधान करुन रहावे. दोन घरांच्या भेटी दरम्यान हात साबणाने धुवावेत किंवा सॅनिटायझर ने निर्जतुक करावेत. शक्यतो मोकळ्या हवेशीर जागेमध्ये माहिती भरावी.
• एक पथक दररोज ५० घरांना भेटी देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान तपासणे, कोमॉर्बिड आहे का याची माहिती घेतील.
• ताप, खोकला, दम लागणे, एसपीओ२ कमी अशी कोविडसदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फेव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करावे. तिथे तपासणी करून उपचार करण्यात येईल.
• कोमॉर्बिड रूग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री करावी.
• प्रत्येक ५ ते १० पथकामागे एक डॉक्टर उपचार व संदर्भ सेवा देतील.
प्रशासनाने पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
• लोकसंख्येनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, शहर, गाव येथे आरोग्य पथके तयार करून त्यांना प्रशिक्षण देऊन साहित्य वाटप करावे.
• कोमॉर्बिड रूग्णासाठी औषधांचा साठा रूग्णालय स्तरावर उपलब्ध करून द्यावा.
• प्रत्येक तालुक्यात एक ताप उपचार केंद्र कार्यरत करणे आवश्यक आहे.
• आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची निर्मिती करावी.
• ऑक्सिजन पुरवठा सुरळित करणे.
• कोविड रूग्णांसाठी दोन-तीन प्रा. आ. केंद्रानुसार एका ॲम्ब्युलन्सची सोय करावी.
• लोकप्रतिनिधी, खाजगी दवाखाने, स्वयंसेविका यांचा मोहिमेसाठी सहभाग करून घ्यावा.या सर्व गोष्टी शासनाच्या सूचनांचे पालन व सोशल डिस्टनसिंग ठेवून करायच्या असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले.