पाण्याच्या टँकरची मागणी आल्यास प्रशासनाने 48 तासात मंजुरी द्यावी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश


दैनिक स्थैर्य । 17 मे 2025। सोलापूर। सद्यस्थितीत जिल्ह्याच्या काही तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती आहे. या अनुषंगाने जवळपास 64 टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाई कृती आराखड्यातील विविध प्रकारच्या 9 उपाय योजनाद्वारेही प्रशासन टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून नागरिकांनी पाण्याच्या टँकरची मागणी केल्यानंतर प्रशासनाने 48 तासाच्या आत टँकर सुरू करावा, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राजू खरे, अभिजीत पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, नारायण पाटील, उत्तम जानकर (ऑनलाईन), अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निरहाळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार सर्व गटविकास अधिकारी सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, टंचाईच्या अनुषंगाने नागरिकांनी मागणी केल्यास 48 तासात प्रशासनाने टँकर सुरू करावा, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात पिण्याच्या तसेच वापराच्या पाण्याची टंचाई भासणार नाही या अनुषंगाने काटेकोरपणे नियोजन करावे. टंचाई उपयोजनाअंतर्गत पाण्याचे विविध स्त्रोत याची माहिती संबंधित यंत्रणांनी अगोदरच घेऊन ठेवावी जेणेकरून टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवताना त्या गतिमान पद्धतीने राबवणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्या अंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध 9 उपाययोजना ची माहिती दिली. मागील वर्षीचा विचार केला तर आज रोजी 179 टँकरने पाणीपुरवठा सुरू होतात तर यावर्षी आज रोजी 64 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये मंगळवेढा तालुक्यात 18 व माळशिरस तालुक्यात 16 टँकर सुरू असून बार्शी मोहोळ व पंढरपूर तालुक्यात एकही टँकर मागणी प्रस्ताव आलेले नाहीत. या टंचाई कृती आराखड्या अंतर्गत जिल्ह्यातील 680 गावांमध्ये टंचाईच्या 1135 उपाययोजना राबवल्या जात असून यासाठी 21 कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी लोकप्रतिनिधी यांनी जिल्ह्यातील विविध पाणी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी टँकर बरोबरच विहीर व विंधन विहीर अधिग्रहण तसेच अन्य टंचाई निवारणार्थ अन्य उपाय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे मागणी करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!