दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२३ | फलटण | मूळ मांडवखडक (ता. फलटण) येथील रहिवासी असलेले व सध्या उल्हासनगर (ठाणे) येथे राहत असलेले नंदकुमार आत्माराम ननवरे व त्यांच्या पत्नीने मंगळवारी राहत्या घराच्या बिल्डींगवरून उडी घेऊन आपले जीवन संपविले. आत्महत्या करण्यापूर्वी ननवरे दाम्पत्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले असून त्यामध्ये एका व्यक्तीच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यात म्हटले आहे. या आत्महत्या प्रकरणात खासदार रणजितसिंह यांचा संबंध असल्याचे अफवा पसरल्याने या प्रकरणात मुद्दामहून काहीजण राजकारण करत असून आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले आहे.
याबाबत खुलासा करताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात मुद्दामहून कोणीतरी राजकारण करत आहे. राज्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर नावाचे अनेकजण आहेत. फलटणमध्येच दहा-अकराजण त्या नावाचे आहेत. ननवरे यांना मी ओळखत नसून त्यांचा आणि माझा कसलाही संबंध आलेला नाही. उलट या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी, आवश्यकता वाटलीच तर स्पेशल ‘एसआयटी’ स्थापन करावी व या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मीच विनंती करत आहे.
ननवरे दाम्पत्याने केलेली आत्महत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ननवरे कुटुंबाच्या शांतीसाठी मी प्रार्थना करतो. या कुटुंबाला न्याय मिळावा, अशीही माझी भूमिका आहे.