अतिवृष्टीमुळे वावदरे येथे घरांची पडझड


दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा शहरासह पश्चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाबरोबरच वाऱयाचा वेगही जास्त असल्याने परळी खोऱयात मोठय़ा प्रमाणावर घरांची पडझड होवून मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत. वावदरे तर जवळपास 10 ते 15 घरांची पडझड झाल्याने भर पावसात बेघर झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाची संततधार सुरु असल्याने परळी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोठे दरड पडत आहे तर कोठे घरांची पडझड. बाहेर कुठे जायचे म्हटलं की रस्त्यांवर झाडे उनमळून पडलेली अशा घटनांचे सत्रच भागात पहायला मिळत आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने शुक्रवारी पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. शुक्रवार दुपारी 3 च्या अहवालानुसार सध्या उरमोडी धरण क्षेत्रात 8.94 टिएमसी पाणीसाठा झाला असून आवक हि 5481 क्यूसेक असल्याने शुक्रवारी उरमोडीच्या विद्युत गृहातून व चारही वक्र दरवाज्यातून एकूण असा एकूण 6291 क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

वावदरे (ता. सातारा) येथे तर 10 ते 15 घरांची पडझड झाली असून कोणाचे छप्पर तर कोणाची भिंतच पडली आहे. सोसाटय़ाच्या वारा अन् पावसाची संततधार यामुळे येथील ग्रामस्थ जीव मुठीत घेवून वास्तव्य करत असल्याचे चित्र आहे. तरी संबंधीत प्रशासनाने नुकसानग्रस्त घरांची पहाणी करुन तत्काळ योग्य त्या सुविधा पुरवाव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.

चार दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद
ठोसेघर, चिखली, जांभे, पवारवाडी, पवनगाव यांसारख्या अनेक अतिदुर्गम भागात गेल्या तिन ते चार दिवसांपासून विद्युत पुरवठा हा बंद असल्याने मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामस्थांनी याबाबत महावितरण परळी शाखा येथे चौकशी केली असता सोसाटय़ाचा वारा अन पाऊस यामुळे विद्युत खांब पडले असल्याचे उत्तर मिळत असल्याने येणारा अमृतमहोत्सवी 15 ऑगस्ट हि अंधारात जाणार की काय अशीच अवस्था आहे.


Back to top button
Don`t copy text!