सोनगाव येथे स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या युवकांचा सन्मान सोहळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १० सप्टेंबर २०२४ | फलटण |
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अथक परिश्रमातून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणार्‍या सुपुत्रांचा सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे आयोजित करण्यात आला. या गुणगौरव समारंभात सर्वच ग्रामस्थ मान्यवर सहभागी झाले होते. ज्या युवकांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्कारमूर्तीपैकी श्री. महादेव तानाजी जगताप यांची आरोग्यसेवकपदी नियुक्ती झाली आहे. तसेच श्री. तेजस धनाजी मोरे यांची बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘फिल्ड ऑफिसर’ म्हणून नेमणूक झाली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, जिद्द, चिकाटी व नम्रता या जोरावर दोघांनी हे यश संपादन केले आहे.

यावेळेस या सत्कारमूर्तींच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. दोघांनीही आपल्या मोगतातून आपला प्रवास वर्णन करत सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि उपस्थित स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे भीमदेव बुरुंगले (मा. चेअरमन फलटण दूध संघ, फलटण) यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतातून यशस्वी युवकांचे व त्यांच्या कुटुंबाचे कौतुक व शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन आणि आयोजनामध्ये प्रा. राजेश निकाळजे यांनी सहभाग घेतला. तसेच मा. सरपंच व सोनगाव विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री. पोपटराव बुरुंगले यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली.

प्रगतशील शेतकरी श्री. हनुमंत थोरात, सामाजिक कार्यकर्ते तानाजी जगताप, युवा संघटक रमेश जगताप, जि. प. शाळा राजाळा सर्कलचे मुख्यध्यापक व तेजसचे पालक श्री. धनाजी मोरे यांनी ही मनोगते व्यक्त केली. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत गावाच्या प्रथम नागरिक सौ. ज्योत्स्ना रमेश जगताप यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका संचालक मंडळ, ग्रामपंचायत सोनगाव, सोनगाव विविध कार्यकारी सोसायटी, श्री. विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ सोनगाव, सर्व तरुण मंडळ सोनगाव व मुख्याध्यापक धनाजी मोरे यांच्या वतीने दोन्ही सत्कारमूर्तींचा हार, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला सहकार्य केलेल्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अभ्यासिकेला १० खुर्च्या दिल्याबद्दल नवनाथ जगताप यांचा व घड्याळ दिल्याबद्दल नामदेव शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी जयाप्पा बेलदार (अण्णा), दत्तात्रय ननावरे, संदीप पिंगळे, भगवान जगदाळे, अरुण वाघ, बाबासो टेंबरे, राजेंद्र आडके, रामहरी पिंगळे, धर्मराज लांडगे, राहुल गायकवाड, रमेश मदने, श्रीकृष्ण बंडगर, गणेश कांबळे, राहुल यादव, डॉ. योगेश बुरुंगले, अमोल सस्ते, सचिन शेवते, शिवाजी ढवळे, सुनिल यादव, युवराज जगताप, तानाजी जगताप, अशोक जगताप, डॉ. निलेश निकाळजे, सुरेश पवार, हनुमंत ननावरे, बाळकृष्ण रिटे, सुनिल रिटे, चैतन्य पिंगळे, बाबा लवटे, गणेश यादव, बाळासो गायकवाड, गणेश नामदास, अनिल रिटे, सुधीर ओव्हाळ, अतुल लोंढे, करण गोरवे, अमोल गायकवाड, निलेश मोरे, मनोज मोरे व सोनगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमांचे आयोजन सर्व तरुण मंडळ सोनगाव व ग्रामस्थ सोनगाव यांच्या वतीने करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!