ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत राज्य शासनाकडे हस्तांतरित; शासकीय वापरापूर्वी स्ट्रक्चरल दुरुस्तीला प्राधान्य


स्थैर्य, सातारा, दि. २ जून : मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा पार पडला. या इमारतीचा शासकीय वापर सुरू करण्यापूर्वी स्ट्रक्चरल दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या इमारतीच्या खरेदीसाठी राज्य मंत्रिमंडळाने ८ सप्टेंबर २०२३ रोजी मान्यता दिली होती. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून राज्य शासनाने ‘एअर इंडिया असेट होल्डिंग कॉर्पोरेशन’कडून १६०१ कोटी रुपयांना ही वास्तू संपादित केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक निधी दिल्यानंतर ही इमारत शासनाच्या ताब्यात आली आहे.

इमारत हस्तांतरणानंतर मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी भोसले म्हणाले, शासकीय कार्यालये या इमारतीत स्थलांतरित करण्यापूर्वी इमारतीची सखोल स्ट्रक्चरल तपासणी व आवश्यक दुरुस्ती करावी. त्यानंतरच अंतर्गत सजावट व इतर कामे हाती घ्यावीत.

कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता दीर्घकालीन टिकाऊपणा लक्षात घेऊन सर्व दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे करावीत. विद्युत यंत्रणा, फिटिंग्ज आणि इतर तांत्रिक सुविधा उच्च दर्जाच्या असाव्यात, असे निर्देश भोसले यांनी दिले.

इमारतीच्या मुख्य प्रवेशभागाचे सुशोभीकरण करण्यात यावे. या कामासाठी देशातील नामांकित वास्तुविशारद आणि तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घ्यावे, असेही ते म्हणाले.

मंत्रालयीन कामकाजासाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांची सोय आणि सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. या नूतनीकरणासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता तातडीने देण्याचे आदेश भोसले यांनी दिले. या इमारतीमुळे विविध कार्यालयांसाठी हक्काची जागा उपलब्ध होऊन प्रशासनाची कार्यक्षमता वाढणार आहे.

एअर इंडिया इमारतीचे हस्तांतरण हा प्रशासकीय पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. गुणवत्तापूर्ण दुरुस्ती आणि नागरिकांच्या सोयीला प्राधान्य देत या वास्तूचा आदर्श शासकीय संकुल म्हणून विकास करण्यात येईल, असे भोसले यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!