

स्थैर्य, सातारा, दि. २ जून : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देणारा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा ५ व ६ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला संभाजी छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दुर्गराज रायगडावर ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य सार्वभौम सत्तेच्या रूपाने जगासमोर उभे राहिले. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी रायगडावर हा सोहळा साजरा केला जातो. यंदाच्या सोहळ्यात ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहिरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा’ आणि ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे विशेष कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहेत.
शुक्रवार, ५ जून रोजी दुपारी पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीस अभिवादन करून सोहळ्याची सुरुवात होईल. त्यानंतर संभाजी छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवभक्तांसह नाणे दरवाजामार्गे गड चढाई केली जाणार आहे. नगारखान्यात गडपूजन पार पडेल. त्यानंतर होळीच्या माळावर पारंपरिक युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली जातील.
पाच जूनच्या सायंकाळी गडावर विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. यामध्ये ढोल-लेझीम, वारकरी संप्रदायाचा टाळ-मृदंग गजर, राजसदेवरील शिवशाहिरांचा जागर यांचा समावेश आहे. यासोबतच शिरकाई देवीचा गोंधळ आणि जगदीश्वर मंदिरात कीर्तन-भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शनिवार, ६ जून रोजी सकाळी ध्वजपूजन आणि ध्वजारोहणाने मुख्य राज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ होईल. यानंतर शाहिरी कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर शिवछत्रपतींच्या पालखीचे राजसदरेवर आगमन होईल आणि राज्याभिषेकाचा मुख्य विधी पार पडेल.
मुख्य विधीदरम्यान संभाजी छत्रपती यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या उत्सवमूर्तीला जलाभिषेक केला जाईल. तसेच सिंहासनारूढ मूर्तीवर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात येणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त रायगडावर दाखल होतात.
या भव्य आणि ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
