दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
गुरुंचे योग्य मार्गदर्शन लाभले आणि गुरुंवर अविचल निष्ठा असेल तर अंगभूत गुणांना नवी झळाळी प्राप्त होते. याचा अनुभव आपल्याला प्रतिभावान गायकांच्या गाण्यातून येतो. असाच काहीसा अनुभव फलटणच्या श्रोत्यांनी काही दिवसांपूर्वी घेतला. निमित्त होते प.पू. गोविंद महाराज उपळेकर यांच्या ५० व्या पुण्यतिथी सोहळ्यात घडलेल्या गायन सेवेचे.
मुंबईच्या परंतु फलटणच्या सूनबाई असलेल्या युवा शास्त्रीय गायिका सौ. मिताली कातरणीकर – प्रभुणे यांचे गायन मंदिरात झाले. उत्तम रियाज, गुरुंचा आशीर्वाद, प्रसन्न सादरीकरण आणि साथीदारांनी केलेली योग्य साथ यामुळे श्रोते यावेळी तल्लीन झाले. गायन सेवा रुजू झाली, भक्ती रसाला स्वरसाज चढला.
विदुषी पद्माताई तळवलकर, डॉ. गोहदकर, डॉ. राम देशपांडे, विश्वजित आणि मिलिंद बोरवणकर, या गुरुंचे मार्गदर्शन घेऊन शास्त्रीय संगीतात सुवर्णपदक आणि द्विपदवीधर झालेल्या सौ. मिताली या सध्या मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट करत आहेत. यापुढील त्यांची कारकीर्द अधिकाधिक समृद्ध होत जाईल, यात शंका नाही, असा विश्वास अनिरुद्ध रानडे यांनी व्यक्त केला आहे.