हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना : कोल्हापूर येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०२ मे २०२३ । कोल्हापूर । हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भागवत कराड यांच्यासह मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. कोल्हापूर येथील पितळी गणपती, ताराबाई पार्क, एम्पायर बिल्डींग येथील रुग्णालयाचे जिल्हास्तरीय उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ.पी. एस. कांबळे, उपायुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता पाटील आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरु करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील.

महाराष्ट्र दिनानिमित्ताने कोल्हापूर जिल्हयातील २८ आरोग्यवर्धनी केंद्रापैकी ६ नगरपालिका क्षेत्रात व १ महानगरपालिका क्षेत्रामधील संस्थेचे रुपांतर, “हिंदु ऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” मध्ये करण्यात आले आहे.

आरोग्यवर्धनी केंद्राअंतर्गत बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता तपासणी, लसीकरण, नेत्र तपासणी व सर्व तपासण्या मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. “आपला दवाखाना” ची वेळ दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत असून सर्व आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

आपला दवाखाना पन्हाळा अंतर्गत जुनी पंचायत समिती इमारत, कागल अंतर्गत हुतात्मा तुकाराम हॉल, मुरगूड, गडहिंग्लज अंतर्गत लाखे नगर, शाहुवाडी अंतर्गत उचतनगर, शिरोळ अंतर्गत भैरेवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजी अंतर्गत आसरानगर येथे व महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत पितळी गणपती ताराबाई पार्क, एम्पायर बिल्डींग, कोल्हापूर येथे आजपासून ‘आपला दवाखाना’ रुग्णासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगामध्ये सन २०२१-२२ मध्ये कोल्हापूर जिल्ह्याकरीता एकूण २८ आरोग्य वर्धनी केंद्रे ( न.पा. १६ व मनपा १२) मंजूर करण्यात आले आहे. सदर आरोग्यवर्धनी केंद्रामध्ये १ वैद्यकिय अधिकारी (एम.बी.बी.एस.), १ स्टाफ नर्स, १ बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी प्रमाणे मुनष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे स्वरुप – राज्यभरात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये रक्त तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा असेल. तसेच बाहय रुग्ण विभागात वैद्य, स्त्री रोग व प्रसुती तज्ज्ञ, बाल आरोग्य तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ असतील. या केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, बहुउद्देशिय कर्मचारी, अटेंडंट, गार्ड आणि सफाई कामगार आदी मनुष्यबळ असेल.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे ३१७ कार्यान्वित झालेल्या ठिकाणी १ मे २०२३ पासून “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” कार्यान्वित करण्यात आला. त्याचप्रमाणे या प्रकल्पाची लोकोपयोगिता लक्षात घेऊन या केंद्रांच्या संख्येत वाढ करुन उर्वरीत ठिकाणी पुढील ६ महिन्यात हा दवाखाना कार्यान्वित करुन त्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार करण्याचे नियोजन आहे.


Back to top button
Don`t copy text!