शिक्षणात मराठी भाषेचा वापर वाढविणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जानेवारी २०२३ । मुंबई । राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी तांत्रिक विषयांचे मराठीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. वरळी येथे आयोजित मराठी विश्व संमेलनात शुभेच्छा देतांना ते बोलत होते.

विश्व मराठी संमेलनाच्या भारदस्त आयोजनासाठी मराठी भाषा विभागाचे अभिनंदन करून मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्य शासन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रभावी पाऊल उचलत आहे. शासकीय कामकाज मराठीतूनच व्हावे, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे संशोधनासारखा विषय मातृभाषेतून शिकविण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच विधी विषयक कामकाज मराठीतून व्हावे यासाठी कायदेविषयक शिक्षण मराठी भाषेतून देण्यात येणार आहे.

मराठी भाषेचा वापर वाढावा यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. आयआयटी मुंबईने यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करून दिले आहे. या माध्यमातून इंग्रजी मधील पुस्तकं पूर्णतः मराठीतून वाचता येणार आहेत. तसेच कोणत्याही भाषेतून मराठी विषय शिकविला गेला तरी त्याचा अभ्यास मराठीतून करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यायी सोपे शब्द शोधून त्यांना दैनंदिन वापरात प्रस्थापित करण्याची आवश्यकता श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!