दर्जेदार दुरुस्ती आणि नागरिकांच्या सोयीला सर्वोच्च प्राधान्य द्या : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले


स्थैर्य, सातारा , दि. ५ जून : मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारतीचे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी या इमारतीची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. या इमारतीत शासकीय कार्यालये स्थलांतरित करण्यापूर्वी सखोल स्ट्रक्चरल तपासणी करावी. दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता नागरिकांच्या सोयीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्य शासनाने नरिमन पॉईंट येथील मोक्याच्या जागेवरील ही वास्तू ‘एअर इंडिया असेट होल्डिंग कॉर्पोरेशन’कडून १६०१ कोटी रुपयांना संपादित केली आहे. इमारत शासनाच्या ताब्यात आल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे आणि मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना इमारतीची सद्यस्थिती, दुरुस्ती आणि प्रस्तावित नूतनीकरणाची सविस्तर माहिती दिली.

यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, दुरुस्ती आणि नूतनीकरण करताना दीर्घकालीन टिकाऊपणा लक्षात घ्यावा. विद्युत यंत्रणा आणि इतर तांत्रिक सुविधांसाठी उच्च दर्जाचे साहित्य वापरावे. इमारतीच्या मुख्य प्रवेशभागाचे सुशोभीकरण करण्यासाठी नामांकित वास्तुविशारदांचे मार्गदर्शन घ्यावे.

राज्याच्या विविध भागांतून मंत्रालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता आणि सुलभता ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे सर्व कामे निर्धारित कालावधीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या कामांसाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता तातडीने द्याव्यात, असे आदेशही त्यांनी दिले.

‘एअर इंडिया’ इमारतीमुळे राज्य शासनाला प्रशस्त आणि सुसज्ज जागा उपलब्ध होणार असून प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल. नागरिकांच्या सोयीला प्राधान्य देत या वास्तूचा आदर्श शासकीय संकुल म्हणून विकास केला जाईल, असा विश्वास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!