
दैनिक स्थैर्य | 18 मे 2025 | सातारा | हवामान खात्याने आज (18 मे) सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या पावसामुळे सातारा आणि आजूबाजूच्या भागांमध्ये पर्जन्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सातारा सह महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ जिल्ह्यांमध्ये पुढील 10 ते 12 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या नैऋत्य मौसमी वाऱ्यांचे प्रबळ प्रभाव असून, मुसळधार पावसाला अनुकूल हवामान तयार झालं आहे. यामुळे साताऱ्यासह इतर जिल्ह्यांमध्ये वीज पडण्याची, वादळी वाऱ्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाताना, वाहन चालवताना आणि बाह्य कामांमध्ये विशेष दक्षता घेण्याचा सल्ला दिला आहे.
साताऱ्यामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, सातारा जिल्हा पुढील काही दिवसांतही असा वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः दुपारी व संध्याकाळी पावसाचा जोर वाढणे शक्य आहे. यामुळे शेतकरी, वाहनचालक आणि सामान्य नागरिकांनी पावसाळी तयारी अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.
येत्या काही दिवसांत मानसून केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज असून, साताऱ्यासह पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, बीड या जिल्ह्यांनाही येलो तसेच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने लोकांना गरजेच्या बाबतीत माहिती देत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.