दैनिक स्थैर्य | दि. १७ एप्रिल २०२३ | फलटण |
महापुरूषांचे कार्यकर्तृत्व आणि विचार विद्यार्थ्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारे असतात. असे विचार आत्मसात करून आयुष्याची दिशा ठरविणे आवश्यक असल्याच्या पार्श्वभूमीवर मुधोजी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाने आयोजित केलेला ‘ज्ञान सप्ताह’ उपक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांनी व्यक्त केले.
महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुधोजी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्यावतीने आयोजित ‘ज्ञान सप्ताह’ उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, उपप्राचार्य प्रा. संजय दिक्षीत, ग्रंथालय विभागप्रमुख प्रा. आनंद पवार, प्रा. बाळासाहेब कांबळे, प्रा. प्रभाकर पवार, प्रा. मेश्राम, प्रा. नवनाथन रासकर, प्रा. मदन पाडवी, प्रा. अनिल टिके, प्रा. गिर्हे, प्रा. अहिवळे आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रा. आढाव म्हणाले, देशातील महापुरूषांनी समाजातील सर्व घटकांसाठी कार्य केले. महापुरूषांचे विचार समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देणारे असून ते आत्मसात करावेत. मुधोजी महाविद्यालयातील शिक्षणाची परंपरा मोठी आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थी देशाच्या विविध भागात काम करताना दिसतात. याचे श्रेय महाविद्यालय संस्थापकांना जाते. दर्जेदार शिक्षणातून देशाचे भावी नागरिक तयार करण्याचे काम प्राध्यापक करीत असल्याने शिक्षणाची गुणवत्ता वाढवली जाणार्या या महाविद्यालयातील विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, अशी अपेक्षा प्रा. आढाव यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी ऐश्वर्या कदम, कुणाल कांबळे, स्नेहलता बिचुकले, प्राजक्ता वाडकर, दत्ता वाघमारे, मयूर निंबाळकर आदी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रा. आनंद पवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मदन पाडवी व प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले. प्रा.नितीन धवडे यांनी आभार मानले. उपक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.