पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी साहेब आत्ताच नियमांची कडक अंमलबजावणी करा आणि कोरोनाला रोखा


स्थैर्य, सातारा, दि. 23 : सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये कोरोना हा विषाणू आता पुन्हा आपले रौद्ररूप धारण करायला लागलेला आहे. सातारा जिल्ह्यात जरी लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले असले तरी आगामी काळामध्ये सर्वसामान्य माणसांना कोरोना पासून वाचवण्यासाठी कडक अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लवकरात लवकर तालुकानिहाय बैठका घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये कोणकोणत्या प्रकारे उपाययोजना करता येतील व कोरोनाला लांब ठेवता येईल या बाबत तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून सध्या होऊ लागलेली आहे.

शाळा व महाविद्यालय तातडीने बंद करण्याची आवश्यकता

सध्या सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालय पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत. तरी आगामी काळामध्ये कोरोना जर आपल्याला प्रत्येक घरापासून रोखायचा असेल तर शाळा व महाविद्यालये काही काळासाठी बंद करावीत. कारण कोरोनासंबंधीचे नियम पाळण्यात विद्यार्थी वर्ग बर्‍याचअंशी दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. शाळा व महाविद्यालय सुरू राहिली तर प्रत्येक घरामध्ये कोरोना आजार थैमान घालण्यासाठी पुन्हा सज्ज होईल. प्रत्येक विद्यार्थ्यामार्फत आपापल्या घरांमध्ये रोज बाहेरून घरात कोरोना पूर्ण क्षमतेने येऊ शकेल.

लग्न व इतर समारंभांना निर्बंध न ठेवता पूर्णतः बंदी घाला

सध्या शासनाने घालून दिलेल्या त्रिसूत्रीचा म्हणजेच मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे व सॅनिटायझर वापर करणे या नियमांचा संपूर्ण फज्जा उडवून सातारा जिल्ह्यामधील बहुतांश मंगल कार्यालयांमध्ये लग्न व इतर समारंभ जोमात सुरू आहेत. तरी आगामी काळामध्ये सर्व मंगल कार्यालयांमध्ये व हॉटेल ठिकाणी शासनाने करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली तरीही काही महाभाग त्यातूनही सुटू शकतील व चुकून एखादा कोरोना बाधित व्यक्ती एखाद्या समारंभामध्ये वावरून आला तर त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अतिशय अवघड व किचकट होईल. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असणारे लग्न व इतर समारंभ यावर पूर्णतः बंदी घालावी किंवा जास्तीत जास्त वीस जणांच्या उपस्थितीत लग्न व इतर समारंभ करण्याची परवानगी द्यावी.

पूर्ण क्षमतेने वाहतूक करत असलेल्या एसटी बसेस व प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालावेत

सध्या सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसेस या पूर्ण क्षमतेने वाहतूक करत असून त्यांच्या बरोबरच प्रवासी वाहतूक दारही पूर्ण क्षमतेने वाहतूक करीत आहेत. आगामी काळामध्ये जर आपल्याला कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर कोरोना पासून वाचण्यासाठी एसटी महामंडळाच्या सर्व बसेस मधून कमी वाहतूक करणे किंवा अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत असणार्‍यांचीच वाहतूक करण्याची परवानगी एसटी महामंडळ व इतर प्रवासी वाहतूकदारांना देणे गरजेचे आहे. तर आणि तरच एसटी महामंडळासह इतर ठिकाणी होणारी गर्दी आवाक्या मध्ये ठेवता येईल आणि त्यातून कोरोनाच्या प्रसाराला आपल्याला थोपवता येईल.

चौकाचौकांमध्ये होणारी गर्दी टाळणे आवश्यक

सध्या सातारा जिल्हा मधील सर्वच शहरांसह ग्रामीण भागांमध्ये ही प्रत्येक चौकाचौकांमध्ये लोकांना मोठ्या गर्दीने बसणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. चौकाचौकात रात्री उशिरापर्यंत ठिय्या मांडून बसणारी टोळकी कोरोनाच्या निर्बंधांविषयी अतिशय बेफीखीरीने वागताना दिसतात. त्यामुळे अशा टोळक्यांवर योग्य ते शासन करून किंवा गांधीगिरी ने त्यांना शिक्षा सुनावून त्यांच्यावर कडक निर्बंध घालणे गरजेचे आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेला काम नसताना घराबाहेर जर कोण आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करून वेळप्रसंगी एखादा गुन्हाही दाखल करण्यात यावा, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.

मागील वर्षीचा आपल्याला कोरोनाशी लढण्याचा अनुभव असल्याने मागील वर्षी ज्या ज्या उपाययोजना करण्यास आपल्याला उशीर झाला त्या त्या उपाययोजना तातडीने करून सातारा जिल्ह्यामधील असणारे सर्वच्या सर्व कोरोना केअर सेंटर, संस्थात्मक विलगीकरण कक्ष व इतर कार्यालये व हॉटेल्स प्रशासनाने ताब्यात घेणे गरजेचे आहे. मागील वेळेस उशीर झाला तो उशीर न होऊ देता वेळेपूर्वीच सर्व गोष्टी होणे गरजेचे आहे. तर आणि तरच आपण कोरोनाशी दोन हात करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आत्ताच्या घडीला सन 2020 मध्ये आपण कोरोनाला निम्म्याहून अधिक परतीच्या वाटेवर पाठवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. जर आपण 2021 मध्ये गाफील राहिलो तर त्याचा तोटा आपल्यासह सर्वांनाच भोगावा लागणार आहे. कोरोनाची लस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांचे लसीकरण होईपर्यंत आपल्याला ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लॉकडाऊनची भिषण परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहून नियम मोडणार्‍यांवर कारवाईचा बडगा उचलणे आवश्यक असल्याचे मत सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!