‘ग्रो’ची ८३ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी


स्थैर्य, मुंबई, दि. ०८: भारतातील अग्रगण्य गुंतवणूक प्लॅटफॉर्म ‘ग्रो’ ने सीरीज डी राउंडमध्ये ८३ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी केली आहे. सिक्वोइया कॅपिटल इंडिया, रिबिट कॅपिटल, वायसी कंटिन्युटी आणि प्रोपेल व्हेंचर्स पार्टनर्स या सध्याच्या गुंतवणुकदारांसह टायगर ग्लोबलने या गुंतवणूक फेरीचे नेतृत्व केले.

२०१७ मध्ये सुरु झालेला ग्रो १.५ कोटी नोंदणीकृत यूझर्ससह, भारतातील वेगाने वाढणारा गुंतवणूक प्लॅटफॉर्म बनला आहे. ग्रो यूझर्सना स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, ईटीएफ, आयपीओ आणि सोन्यात सोप्या, पेपरलेस आणि अडथळा विरहीत पद्धतीने गुंतवणूक करण्यास मदत करते.

ग्रो चे सीईओ आणि सह संस्थापक ललित केशरे म्हणाले. “भारतातील प्रत्येकाला गुंतवणूक करता यावी तसेच ती पारदर्शक असावी, यासाठी आम्ही ५ वर्षांपूर्वी ग्रोची सुरुवात केली. आजवर आम्ही चांगली प्रगती केली असली तरीही ही केवळ सुरुवातच आहे, असे वाटते. भारतातील जवळपास फक्त २५ दशलक्ष लोक स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत राहू. नव्या निधीद्वारे आम्हाला नवीन उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणे, अधिक कौशल्य विकसित करणे तसेच आमचे फायनान्शिअल एज्युकेशन प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी मदत होईल”.

नव्याने उभारलेल्या निधीद्वारे प्रॉडक्ट सूट विस्तारण्याची, उच्च दर्जाचे कौशल्य घेण्याची, तसेच वित्तीय शिक्षण आणि जागृतीसाठी अधिक गुंतवणुकीची ग्रो ची योजना आहे. सुरुवातीपासूनच आर्थिक शिक्षणाचा कंटेंट वाढवण्यावर ग्रो ने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पुढील दोन वर्षात, मिलेनिअल्सच्या दृष्टीने अनेक वित्तीय शिक्षणाचे उपक्रम राबवणे तसेच वित्तीय सेवांसाठीचे मार्केट विस्तारण्याची कंपनीची योजना आहे.

ग्रो हा भारतातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड वितरण प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. आणि त्याने दरमहा अडीच लाखाहून अधिक नवीन एसआयपी सुरु केल्या आहेत. शैक्षणिक कंटेंटवर भर दिल्याने वाढलेल्या यूझर्सच्या अनुभवामुळे ग्रो मिलेनिअल गुंतवणूकदारांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!