महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विषय तज्ज्ञांच्या सेवा उपलब्धतेसाठी शासन निर्णय निर्गमित


दैनिक स्थैर्य । दि. ०५ मे २०२३ । मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या विविध पदभरती परीक्षांच्या गोपनीय कामासाठी विषयतज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

आयोगाच्या गोपनीय व संवेदनशील कामकाजासाठी काही वेळेस शैक्षणिक संस्थांमधील संबंधित विषयांतील तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करुन घेताना आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा परिणाम परीक्षांच्या वेळापत्रकावर होतो. परिणामी शासन सेवेत कामकाज करण्यासाठी आवश्यक उमेदवार वेळेवर मिळू शकत नाहीत. त्यामुळे पुरेशा मनुष्यबळाअभावी शासकीय कामकाजाच्या गतिमानतेवर परिणाम होत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन विविध शैक्षणिक संस्थांमधील विषय तज्ज्ञांच्या सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगास उपलब्ध व्हाव्यात याकरिता या शासन निर्णयाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

या शासन निर्णयान्वये संबंधित सर्व शैक्षणिक संस्थांमधील अध्यापकीय संवर्गातील विषय तज्ज्ञांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सोपविण्यात आलेली गोपनीय व संवेदनशील कामे आयोगाने विहित केलेल्या कालमर्यादेत व दर्जात्मक स्वरुपात पूर्ण करुन देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विहित केलेल्या कालमर्यादेत संबंधित विषयतज्ज्ञांची सेवा आयोगास उपलब्ध करुन देणे उपरोक्त शैक्षणिक संस्था प्रमुखांवर बंधनकारक राहणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विषयतज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी निगडित कामकाजासाठी समन्वयक म्हणून क्षेत्रीय स्तरावरील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजाच्या आवश्यकतेनुसार विषय तज्ज्ञांच्या सेवा आयोगास उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक सहकार्य करण्याची जबाबदारी अशा समन्वयकांवर राहणार आहे, असेही शासन निर्णयात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!