

साताऱ्याचा ऐतिहासिक वारसा जतन करून त्यांना जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यांतर्गत साताऱ्यातील ‘किल्ले अजिंक्यतारा’ संवर्धनासाठी १३४.८० कोटी रुपये, तर ‘संगम माहुली समाधी स्थळ’ संवर्धन प्रकल्पासाठी १३३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
स्थैर्य, सातारा, दि. १८ : मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांबाबत शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सहा महत्त्वाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना (एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या निधीसह) मंजुरी देण्यात आली. या बैठकीस साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी किल्ले अजिंक्यतारा आणि संगम माहुली संवर्धन आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. महाराष्ट्रातील गड-किल्ले हे राज्याच्या इतिहासाचे जिवंत प्रतीक असून त्यांचे जतन आणि संवर्धन ही शासनाची प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
१. किल्ले अजिंक्यतारा विकास आराखडा (मंजूर निधी – १३४.८० कोटी रुपये)
सातारा शहराच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या किल्ले अजिंक्यतारा परिसराचा या आराखड्यातून सर्वंकष विकास केला जाणार आहे.
-
प्रमुख कामे: किल्ल्याचे जतन व संवर्धन, बुरुजांचे पुनरुज्जीवन, राजसदरेचे संवर्धन, अत्याधुनिक लटकता पूल (हँगिंग ब्रिज), पर्यटनासाठी आकर्षक स्थळांची निर्मिती, प्रेक्षक गॅलरी, नवीन पादचारी मार्ग, लँडस्केपिंग आणि पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा (स्वच्छता व विश्रांतीगृहे) उभारल्या जातील. सर्व कामे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
२. संगम माहुली समाधी स्थळ संवर्धन प्रकल्प (मंजूर निधी – १३३ कोटी रुपये)
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या संगम माहुलीला या प्रकल्पामुळे जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाची नवी ओळख मिळणार आहे.
-
प्रमुख कामे: महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. याशिवाय परिसराचा लँडस्केप विकास, ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर व घाटाचे संवर्धन, नवीन हँगिंग ब्रिज, व्ह्यूइंग गॅलरी आणि सुसज्ज पाथवे उभारण्यात येणार आहेत.