

श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूलच्या विकासात मोलाचे योगदान; मान्यवरांकडून कार्याचा गौरव
स्थैर्य, चव्हाणवाडी, दि. ३ जून : शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कार्यतत्परतेने सेवा बजावणारे श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडीचे मुख्याध्यापक आयु. विठ्ठल बाबुराव निकाळजे हे नुकतेच साश्रूनयनांनी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेला त्यांचा सत्कार सोहळा अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आणि उत्कृष्ट व्यवस्थापक
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विठ्ठल निकाळजे सर यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता, नेतृत्वगुण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ याबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. निकाळजे सर हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगत, त्यांनी मुख्याध्यापक म्हणून शाळेचे व्यवस्थापन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सांभाळल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
‘जिद्द कधी हरली नाही; संधीचे सोने केले’
सत्काराला उत्तर देताना विठ्ठल निकाळजे सर म्हणाले, “मी एका सामान्य कुटुंबात जन्माला आलो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष होता, पण जिद्द कधी हरली नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करायचे आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवायचा, हा विचार मनात ठेवून मी सदैव कार्यरत राहिलो. ज्या-ज्या शाळांमध्ये काम केले, तिथे ‘रयत सेवक’ म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावली.” यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली लक्ष्मीबाई यांच्या कार्याला वंदन केले.
शाळेचा कायापालट आणि कृतज्ञता
चव्हाणवाडी येथील शाळेत केलेल्या विकासकामांचा उल्लेख करत ते म्हणाले की, कमिन्स इंडिया कंपनी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून शाळेचे वॉल कंपाऊंड, संगणक कक्ष, रंगरंगोटी, बोरवेल, प्रशस्त सुलभ शौचालय आणि इंटरऍक्टिव्ह डिस्प्ले बोर्ड यांसारखी अनेक विकासकामे करता आली. या सर्व कार्यात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दत्तात्रय (तात्या) चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सांगत त्यांनी सहकाऱ्यांचे आभार मानले. “सेवानिवृत्तीनंतरही जिथे माझी गरज भासेल, तिथे मी सदैव उपलब्ध असेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
विविध संस्थांकडून सत्कार
यावेळी शिक्षक सहकाऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन निकाळजे सरांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या भारतीय बौद्ध महासभा (बीबीएम फॅमिली) परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही त्यांना पुष्पगुच्छ अर्पण करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दत्तात्रय (तात्या) चव्हाण, चव्हाणवाडीचे उपसरपंच प्रशांत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गोरख शिंदे, स्कूल कमिटी सदस्या सुप्रियाताई अहिरेकर, आदर्श विद्यालय शिरवळचे उपशिक्षक चंद्रकांत भोईटे, ग्रंथपाल लता भोईटे, बिजवडी हायस्कूलचे उपशिक्षक ज्ञानेश्वर वाघ, नूतन प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र राजपुरे, जितेंद्र चव्हाण (फौजी), उद्योजक सचिन अहिरेकर, किशोर शिंदे, प्रगत शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे, उपशिक्षक बाबासाहेब जगताप, रामचंद्र मोरे, आनंद जगताप, विजय निकाळजे, अजय निकाळजे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.