

गिरवी नजीकच्या बोडकेवाडी (ता. फलटण) परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पिके व फळबागा करपू लागल्या आहेत. दुसरीकडे रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थ दुहेरी संकटात सापडले आहेत.
स्थैर्य, गिरवी, दि. 17 मे : फलटण तालुक्यातील गिरवी नजीकच्या पश्चिमेकडील बोडकेवाडी भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलाव व विहिरींनी तळ गाठला असून, शेतीतील पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. दुसरीकडे, गिरवी ते बोडकेवाडी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने येथील ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना ‘पाणीटंचाई आणि खराब रस्ते’ अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
कोरडी शेततळी आणि पिकांना फटका:
वाढत्या तापमानामुळे परिसरातील तलावांच्या पाण्याची पातळी तळाशी गेली आहे, तर विहिरी आटल्या आहेत. नाला बंडिंग आणि शेततळी पूर्णपणे कोरडीठणठणीत पडली आहेत. पाण्याअभावी शेतातील भाजीपाला सुकून गेला असून भुईमूग, गवार, कांदा यांसारखी पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
फळबागा धोक्यात; धोम-बलकवडीच्या पाण्याची प्रतीक्षा:
डाळिंब, पेरू, आवळा, अंजीर, द्राक्ष, शेवगा, नारळ, पपई आणि केळी यांसारख्या फळबागा जगवणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे झाले आहे. ही पिके वाचवण्यासाठी शेतकरी धोम-बलकवडी उजव्या कालव्याच्या पाण्याची चातकासारखी वाट पाहत आहेत. येत्या पंधरा दिवसांत पाणी न मिळाल्यास हाती आलेली पिके वाया जातील. त्यामुळे “बैल गेला अन् झोपा केला” अशी अवस्था होऊ नये, यासाठी धोम-बलकवडी उजवा कालवा लाभक्षेत्रातील शेतकरी संघटनेने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्याची आक्रमक मागणी केली आहे.
रस्त्यांची दुरवस्था; जीव मुठीत धरून प्रवास:
पाण्याच्या समस्येसोबतच दळणवळणाचीही मोठी अडचण या भागात निर्माण झाली आहे. गिरवी ते बोडकेवाडी रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
बोडकेवाडी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या या दुहेरी समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. शेतीसाठी तातडीने पाणी आवर्तन सोडावे आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
