गॅलेक्सी को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीची गरूड भरारी; ४४.१० कोटींचा संमिश्र व्यवसाय

संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन यादव यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ७ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण (जि. सातारा) येथील गॅलेक्सी को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेच्या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या संमिश्र व्यवसायात विक्रमी १५ कोटींनी वाढ होऊन संस्थेचा संमिश्र व्यवसायाने अल्पावधीत ४४.१० कोटींचा यशस्वी टप्पा गाठला आहे. संस्थेच्या ठेवी २५.२५ कोटी तसेच कर्जवाटप १८.१८ कोटी असून त्यापैकी ५१% इतका सोनेतारण कर्जव्यवहार आहे, अशी माहिती के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर व संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. सचिन बबनराव यादव यांनी दिली.

सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. संस्था ५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत असताना हेड ऑफीस व तीन शाखांच्या माध्यमातून संस्थेने अल्पावधीत गाठलेला संमिश्र व्यवसायाचा टप्पा हा लक्षणीय दिसून येतो.

संस्थेस ३८ लाख इतका नफा झाला असून सभासदांना लाभांश देण्याचा मानस संस्थेचे चेअरमन श्री. सचिन यादव यांनी बोलून दाखविला आहे. संस्थेचे चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ व प्रशिक्षित सेवक वर्ग, सल्लागार यांचा सहकार्याने चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असतानादेखील संस्थेच्या संमिश्र व्यवसायात विक्रमी ५१% वाढ करणारी, जिल्हा कार्यक्षेत्र असणारी ‘गॅलेक्सी को-ऑप. क्रेडिट सोसायटी’ एकमेव संस्था ठरली आहे.

संस्थेचे सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाअखेर १.७० कोटींचे भागभांडवल संस्थेकडे जमा आहे. संस्था येणार्‍या कालावधीमध्ये संस्थेचे कार्यक्षेत्र हे विभाग स्तरावर वाढवून पुणे येथे नवीन शाखा सुरू करण्याचा मानसदेखील चेअरमन यादव यांनी बोलून दाखवला आहे.

संस्थेस सन २०२३-२०२४ सालातदेखील ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार प्राप्त झाला असून हा पुरस्कार सलग तीन वर्षे प्राप्त करून संस्थेने एका नवा विक्रम प्रस्थापित करून नावलौकिक मिळविल्याचीही माहिती चेअरमन यादव यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!