कु. सिद्धाली शहांच्या जागतिक विक्रमाची साताऱ्यात दखल; जलमंदिर पॅलेसमध्ये खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या हस्ते सन्मान

फलटणच्या नगरसेविका सिद्धाली शहा यांची ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका म्हणून नोंद झाली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २७ ऑगस्ट : फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांची ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या वतीने ‘जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका’ (Youngest Municipal Corporator – Female) म्हणून अधिकृत नोंद झाल्याबद्दल सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले.

अद्वितीय कामगिरीचे साताऱ्यात कौतुक

कु. सिद्धाली शहा यांनी २१ डिसेंबर २०२५ रोजी अवघ्या २१ वर्षे, १० महिने आणि ५ दिवस या वयात नगरसेविका पदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळत हा जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना, “आपल्या कर्तृत्वाचा हा गौरव असाच वाढत राहो आणि आपल्या हातून समाजसेवेचे उत्तम कार्य घडो,” अशा शब्दांत त्यांनी कु. सिद्धाली शहा यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे हे मानाचे प्रमाणपत्र बहाल झाल्याने फलटण शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जलमंदिर पॅलेस येथे पार पडलेल्या या विशेष सत्काराच्या प्रसंगी सातारा येथील नगरसेवक शंकर माळवदे, सुनिल काटकर, फलटणचे माजी नगरसेवक अनुप शहा, माऊली फाउंडेशनच्या विश्वस्त मिनाक्षी लाळगे आणि आशिष लाळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Back to top button
Don`t copy text!